
नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर (हिं.स.)न्यूझीलंड 'अ' विरुद्धच्या पहिल्या अनधिकृत कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघ पुन्हा एकदा बॅकफूटवर असल्याचे दिसत होते. पहिल्या डावात भारत 'अ' संघ ११३ धावांवर सर्वबाद झाला. त्यानंतर त्यांचे गोलंदाज न्यूझीलंडच्या फलंदाजांना रोखण्यात अपयशी ठरले आणि यजमान संघाने ३१७ धावा केल्या.
भारत 'अ' संघाला त्यांच्या दुसऱ्या डावातही चांगली सुरुवात करता आली नाही. पण, देवदत्त पडिक्कल आणि साई सुदर्शन यांनी संघाला सावरण्याचा प्रयत्न केला आहे. रविवारी खेळ संपला तेव्हा, भारतीय संघाने दुसऱ्या डावात दोन गडी गमावून १०६ धावा केल्या होत्या. ते अजूनही न्यूझीलंडपेक्षा ९८ धावांनी पिछाडीवर आहेत.
भारत 'अ' संघातील निम्म्याहून अधिक क्रिकेटपटू कसोटी संघाचा भाग आहेत आणि त्यांना न्यूझीलंडमधील परिस्थितीशी परिचित करून खऱ्या आव्हानासाठी तयार करण्याकरिता हा सामना आयोजित करण्यात आला होता. मात्र, टीम इंडियाचे स्टार फलंदाज याच परीक्षेत अपयशी ठरले. यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल यांची सलामीची जोडी पहिल्या डावात अपयशी ठरली आणि हाच ट्रेंड दुसऱ्या डावातही कायम राहिला. राहुलला दुहेरी आकडा गाठणे कठीण जात आहे. तो पहिल्या डावात खाते उघडण्यात अपयशी ठरला आणि दुसऱ्या डावात केवळ चार धावाच करू शकला.
पहिल्या डावात १७ धावा करणाऱ्या यशस्वीला दुसऱ्या डावात पाचपेक्षा जास्त धावा करता आल्या नाहीत. जेव्हा सुदर्शन आणि पडिक्कल यांनी संघाची सूत्रे हाती घेतली, तेव्हा इंडिया 'अ' संघाची धावसंख्या दोन गडी गमावून १० धावांवर होती. दोघांनी मिळून दिवसाचा खेळ संपेपर्यंत एकही गडी बाद होऊ दिला नाही. पडिक्कल ५६ धावांवर नाबाद आहे, तर सुदर्शन ३९ धावांवर खेळत आहे. पडिक्कलने आतापर्यंत ८९ चेंडूंचा सामना केला असून नऊ चौकार मारले आहेत. सुदर्शनने १०४ चेंडूंचा सामना करत पाच चौकार मारले आहेत.
तत्पूर्वी, न्यूझीलंडने दिवसाची सुरुवात तीन गडी बाद १३५ धावांवर केली. त्यांनी सहजपणे आपली धावसंख्या ३०० च्या पुढे नेली. पहिल्या दिवशी ७६ धावा करणारा कर्णधार राइस मारियू या डावात संघाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज राहिला. दुसऱ्या दिवशी डीन फॉक्सक्रॉफ्टने सात चौकारांच्या मदतीने ७९ चेंडूंमध्ये ५१ धावा करून अर्धशतक झळकावले. कर्टिस हीफीने १३४ चेंडूंमध्ये ४४ धावा केल्या.
भारताकडून अंशुल कंबोज आणि आकिब नबी यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. आकाश दीपने दोन बळी घेतले. मुकेश चौधरी आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे