मॅट हेन्री भारताविरुद्धच्या उर्वरित तीन टी-२० सामन्यांतून बाहेर
क्राइस्टचर्च(न्यूझीलंड), 25 ऑक्टोबर (हिं.स.)न्यूझीलंडने भारताविरुद्धच्या मालिकेतील उर्वरित सामन्यांसाठी आपल्या वेगवान गोलंदाजांच्या कामाचा ताण नियंत्रित करण्याच्या नियोजित धोरणांतर्गत, त्यांना आळीपाळीने विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. मॅट हे
न्यूझीलंडचा क्रिकेट संघ


क्राइस्टचर्च(न्यूझीलंड), 25 ऑक्टोबर (हिं.स.)न्यूझीलंडने भारताविरुद्धच्या मालिकेतील उर्वरित सामन्यांसाठी आपल्या वेगवान गोलंदाजांच्या कामाचा ताण नियंत्रित करण्याच्या नियोजित धोरणांतर्गत, त्यांना आळीपाळीने विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. मॅट हेन्री आता टी-२० मालिकेत खेळणार नाही. तो क्राइस्टचर्चमध्येच थांबणार आहे आणि त्यानंतर २ नोव्हेंबर रोजी ऑकलंडमध्ये वनडे संघात सहभागी होईल.

शनिवारी झालेल्या सामन्यात हेन्रीने केवळ दोन षटके टाकली होती, त्यानंतर त्याला मैदान सोडावे लागले. कर्णधार मिचेल सँटनरच्या माहितीनुसार, त्याला 'काफ मसल'मध्ये ताण जाणवत होता. लॉकी फर्ग्युसन, ज्याला खबरदारीचा उपाय म्हणून मैदान सोडावे लागले होते, तो वेलिंग्टनमध्ये होणारा तिसरा टी-२० सामना खेळणार नाही. मात्र, तो ऑकलंड आणि हॅमिल्टनमधील शेवटच्या दोन सामन्यांसाठी पुन्हा संघात सामील होईल. काईल जेमिसन, जो या मालिकेत आतापर्यंत खेळलेला नाही, तो तिसऱ्या टी-२० सामन्यानंतर वेलिंग्टनमध्येच थांबेल आणि 'बेसिन रिझर्व्ह'वर कँटरबरीसाठी 'फोर्ड ट्रॉफी' सामना खेळेल. याचा अर्थ तो शेवटच्या दोन टी-२० सामन्यांत उपलब्ध नसेल, पण वनडे मालिकेसाठी तो पुन्हा संघात परत येईल.

ब्लेअर टिकनर शेवटच्या तीन सामन्यांसाठी संघात सामील होईल, तर जोश क्लार्कसन शेवटच्या दोन सामन्यांसाठी संघाशी जोडला जाईल. विशेष म्हणजे, दुखापतींमुळे बाहेर पडलेल्या झॅक फोक्स आणि मार्क चॅपमन यांच्या जागी या दोघांची सुरुवातीच्या १६ सदस्यीय संघात बदली खेळाडू म्हणून निवड करण्यात आली होती. याव्यतिरिक्त, तिसऱ्या टी-२० सामन्यासाठी मॅट फिशर देखील संघासोबत वेलिंग्टनला प्रवास करेल.

मुख्य प्रशिक्षक रॉब वॉल्टर म्हणाले, आमच्या संघात क्रिेकेटपटूंची चांगली उपलब्धता आहे, हे आमचे भाग्यच आहे. यामुळे आम्ही आमच्या वेगवान गोलंदाजांवरील कामाचा ताण नियंत्रित करण्यासाठी विविध खेळाडूंना संधी देऊ शकतो. आगामी सर्व क्रिकेट सामन्यांमध्ये हे गोलंदाज संघासाठी सर्वोत्तम कामगिरी करण्यास सज्ज असतील, याची खात्री करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

न्यूझीलंडकडे सध्याच्या संघात जेकब डफी, नॅथन स्मिथ आणि ॲडम मिल्ने असे पर्यायही उपलब्ध आहेत, ज्यांचा वापर ते २-० ने पिछाडीवर पडलेली मालिका फिरवण्यासाठी करू शकतात. टी-२० मालिकेनंतर पाच सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाईल आणि त्यानंतर लगेचच भारतासोबत दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू होईल. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा दौरा आहे, जिथे न्यूझीलंड चार कसोटी सामने खेळणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande