
बंगळुरु, 25 ऑक्टोबर (हिं.स.) इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) आगामी २०२७ हंगामासाठी सर्व फ्रँचायझी आपापले संघ तयार करत आहेत. आयपीएल २०२७ चा लिलाव डिसेंबरमध्ये होणार आहे. सर्व संघ लवकरच त्यांच्या कायम ठेवलेल्या क्रिकेटपटूंचू यादी जाहीर करतील. दरम्यान, भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, ज्याने आपल्या कर्णधारपदाखाली चेन्नई सुपर किंग्सला पाच आयपीएल विजेतेपदे मिळवून दिली, त्याने स्वतःच्या कामगिरीबद्दल एक मोठी माहिती दिली आहे. त्याने आगामी आयपीएल हंगामासाठी स्वतःची तुलना एका जुन्या गाडीशी केली आहे. धोनी म्हणाला, आशा आहे की, ही विंटेज गाडी अशीच चांगली धावत राहील. इतकेच नाही तर, धोनीने बंगळूरुमधील एका कार्यक्रमात आरसीबीचे कौतुक केले आणि त्यांना विजयासाठी पात्र म्हटले.
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी २००८ पासून आयपीएलमध्ये खेळत आहे आणि तो चेन्नई सुपर किंग्सचा सदस्य आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने पाच वेळा आयपीएल जिंकली आहे आणि शेवटचे विजेतेपद त्यांनी २०२३ मध्ये पटकावले होते. धोनी २०२३ पासून चेन्नई सुपर किंग्सकडून खेळत आहे. आता ४५ वर्षांचा असलेला धोनी, बंगळूरुमधील एका आरोग्य कार्यक्रमात २०२७ च्या आयपीएल हंगामात खेळण्याबद्दल म्हणाला, बघा डॉक्टर, सर्वात आधी मला काही चाचण्या करून घ्याव्या लागतील. डिसेंबरपूर्वी, पुढचा हंगाम खेळण्यासाठी मी किती मजबूत आहे हे मला पाहावे लागेल. धोनी पुढे गंमतीने म्हणाला, जर मी तंदुरुस्त नसेन, तर ती तुमची जबाबदारी आहे आणि मला तंदुरुस्त ठेवण्याची जबाबदारीही तुमचीच आहे. ही जुनी विंटेज गाडी रस्त्यावर सुरळीतपणे धावेल याची तुम्हाला खात्री करावी लागेल.
मागील हंगामात दुखापतीमुळे धोनी चेन्नई सुपर किंग्ससाठी एकही सामना खेळू शकला नाही. २०२५ च्या आयपीएल हंगामापासून धोनी एकही सामना खेळलेला नाही. मागील हंगामात धोनीला गंभीर दुखापत झाली होती आणि परिणामी तो एकही सामना खेळू शकला नाही. धोनीवर यापूर्वी गुडघ्याची शस्त्रक्रिया झाली होती, ज्यामुळे तो गेल्या काही वर्षांपासून आयपीएलमध्ये खेळू शकला नाही.
२०२३ पासून धोनीच्या आयपीएलमधून निवृत्तीच्या अफवा पसरत आहेत. पण, धोनीने सातत्याने या अफवा फेटाळून लावल्या आहेत आणि तो मैदानावर परतला आहे. आता, जर धोनी तंदुरुस्त राहिला, तर तो पुढच्या हंगामात एक प्रभावी क्रिकेटपटू म्हणून चेन्नईमध्ये परत येऊ शकतो. पण, याचा निर्णय केवळ धोनीच घेऊ शकतो.
चेन्नई सुपर किंग्स २०२३ च्या हंगामापासून आयपीएलमध्ये खराब कामगिरी करत आहे, तर दुसरीकडे आरसीबीने उल्लेखनीय कामगिरी करून इतिहास रचला आहे. आरसीबीने २०२५ च्या आयपीएल हंगामात पहिल्यांदा विजेतेपद पटकावले. आरसीबीकडून खेळणाऱ्या विराट कोहलीला २००८ पासून सुरू झालेल्या १८ वर्षांनंतर पहिल्यांदा आयपीएल ट्रॉफी उचलायची संधी मिळाली.
आरसीबीने २०२५ च्या हंगामात पहिल्यांदा ट्रॉफी जिंकली आणि त्यानंतर २०२६ च्या आयपीएल हंगामात सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. आरसीबीच्या कामगिरीबद्दल धोनी म्हणाला, गेल्या दोन वर्षांत आम्हाला खूप संघर्ष करावा लागला आहे. हे नाकारता येणार नाही आणि त्यात लाज वाटण्यासारखे काही नाही. आरसीबीने गेल्या दोन हंगामात उत्कृष्ट कामगिरी केली आहे आणि सातत्याने चांगली कामगिरी केली आहे, तर आम्हाला तसे करता आले नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे