
लातूर, 25 ऑक्टोबर (हिं.स.)।
लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी चारा लागवडीच्या माध्यमातून उत्पन्नाचे नवे दालन खुले झाले आहे. ‘व्हीबी-जी राम जी’ (विकसित भारत-रोजगार व आजीविका हमी मिशन) योजनेअंतर्गत एका एकरात चारा लागवडीसाठी १ लाख २१ हजार ८१५ रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. विशेष म्हणजे, केवळ चार महिन्यांत चारा विक्रीतून एकरी दीड लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळविण्याची संधी शेतकऱ्यांना मिळू शकते. या पथदर्शी उपक्रमाची राज्यभर अंमलबजावणी करण्यात येणार असून, इच्छुक शेतकऱ्यांनी १ नोव्हेंबर २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्या संकल्पनेतून लातूर जिल्ह्यात हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्यातील चारा उपलब्धता वाढविणे आणि शेतकऱ्यांना उत्पन्नाचे पर्यायी साधन उपलब्ध करून देणे, हा यामागील उद्देश आहे. लातूर जिल्हा प्रशासनाच्या या उपक्रमाला राज्य शासनाने मान्यता दिली असून, आता तो राज्यभर राबविण्यात येणार आहे.
एका एकरासाठी १ लाख २१ हजार रुपयांपर्यंत सहाय्य
या उपक्रमांतर्गत वैयक्तिक जमिनीवरील एक एकर चारा लागवडीसाठी एकूण १ लाख २१ हजार ८१५ रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. यामध्ये ८४ हजार ९५६ रुपये मजुरीसाठी, तर ३६ हजार ८५९ रुपये बियाणे, खते आणि इतर आवश्यक साहित्यासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
जिल्हा वार्षिक योजनेतून ‘महाबीज’चे उच्च दर्जाचे ‘स्पीडफीड’ बियाणे शेतकऱ्यांना मोफत पुरविण्यात येत आहे. जमिनीची साफसफाई, पूर्वमशागत, पेरणी, खत व्यवस्थापन, पाणी देणे, डवरणी, निंदणी आणि चारा कापणी अशा विविध कामांसाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे या उपक्रमात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांवर स्वतःच्या खिशातून खर्च करण्याचा आर्थिक भार पडणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पशुधन नसले तरी चारा विकता येणार
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे स्वतःचे पशुधन असणे बंधनकारक नाही. रब्बी हंगामात सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता असलेल्या शेतकऱ्यांना या उपक्रमात सहभागी होता येणार आहे. उत्पादित चारा स्वतःच्या जनावरांसाठी वापरण्याबरोबरच जिल्ह्यातील इतर पशुपालकांना विकण्याचीही मुभा राहणार आहे.
चारा विक्रीतून शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न मिळू शकते. योग्य नियोजन आणि उत्पादनाला बाजारपेठ मिळाल्यास चार महिन्यांत एकरी दीड लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळविण्याची संधी असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. मात्र, प्रत्यक्ष उत्पन्न हे चाऱ्याचे उत्पादन, विक्रीचा दर आणि बाजारपेठेतील मागणी यावर अवलंबून राहणार आहे.
‘स्पीडफीड’ची एकदा पेरणी, तीन वेळा कापणी
या उपक्रमासाठी निवडण्यात आलेल्या ‘महाबीज’च्या ‘स्पीडफीड’ चारा बियाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे पेरणीनंतर अवघ्या ५५ ते ६० दिवसांत पहिली कापणी करता येते. त्यानंतर ३५ ते ४० दिवसांच्या अंतराने आणखी दोन कापण्या घेता येतात. अशा प्रकारे एकाच पेरणीतून तीन वेळा हिरवा चारा मिळू शकतो. या तिन्ही कापण्यांसाठी मजुरीच्या आर्थिक सहाय्याची तरतूदही करण्यात आली आहे.
१ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन
या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी १ नोव्हेंबर २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. लातूर जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर पशुसंवर्धन विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेल्या गुगल फॉर्मद्वारे अर्ज करता येणार आहे.
रब्बी हंगामात सिंचनाची सुविधा असलेल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, चारा लागवडीतून उत्पन्नाचे नवे साधन निर्माण करावे आणि जिल्ह्यातील पशुधनासाठी हिरव्या चाऱ्याची उपलब्धता वाढविण्यास हातभार लावावा, असे आवाहन लातूर जिल्हा प्रशासनाने केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis