
लातूर, 25 ऑक्टोबर (हिं.स.)।
लातूर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आणि पाणीचोरीला आळा घालण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने मुख्य जलवाहिनीवरील अनधिकृत नळजोडण्यांविरोधात पुन्हा कारवाई केली. जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड आणि महानगरपालिका आयुक्त राहुल कुलकर्णी यांच्या निर्देशानुसार रविवारी (दि. २५ ऑक्टोबर) राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत तब्बल २८ अनधिकृत नळजोडण्या तोडण्यात आल्या. तसेच विनापरवाना पाणी उपसण्यासाठी वापरण्यात येणारे पाइपही जप्त करण्यात आले.
मागील महिनाभरात मुख्य जलवाहिनीवरील अनधिकृत नळजोडण्यांविरोधात करण्यात आलेली ही तिसरी मोठी कारवाई आहे. यापूर्वी दोन वेळा अनधिकृत जोडण्या तोडण्यात आल्या होत्या. मात्र, काही ठिकाणी अद्यापही अशा जोडण्या असल्याचे निदर्शनास आल्याने प्रशासनाने पुन्हा विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश दिले होते.
महापालिकेच्या विशेष शोध पथकाने मांजरा धरणातील धनेगाव येथून हरंगूळ जलशुद्धीकरण केंद्रापर्यंतच्या मुख्य जलवाहिनीवरील अनधिकृत नळजोडण्या खंडित केल्या. महानगरपालिका, महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे ही मोहीम राबविली.
तांदुळजा ते हिंगणगावपर्यंत कारवाई
या मोहिमेत तांदुळजा येथे एक, रांजणी येथे पाच, घारगाव येथे दहा, ताडगाव येथे एक आणि हिंगणगाव येथे अकरा अशा एकूण २८ अनधिकृत नळजोडण्या तोडण्यात आल्या. यामध्ये एक इंच, दोन इंच, पाऊण इंच आणि अर्धा इंच व्यासाच्या पाइप जोडण्यांचा समावेश होता.
या मोहिमेदरम्यान तांदुळजा येथे महानगरपालिका आयुक्त राहुल कुलकर्णी यांनी स्वतः उपस्थित राहून कारवाईचा आढावा घेतला आणि संबंधितांना मार्गदर्शन केले.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी मेघना, उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे, तहसीलदार सौदागर तांदळे, पोलीस उपनिरीक्षक अंधारे तसेच मोहिमेचे समन्वयक व सनियंत्रण अधिकारी तथा उपायुक्त (पाणीपुरवठा) डॉ. पंजाब खानसोळे उपस्थित होते. याशिवाय कार्यकारी अभियंता गणेश देवनीकर, कनिष्ठ अभियंता प्रवीण चव्हाण, राठोड, राजे आणि संबंधित कर्मचारी सहभागी झाले होते.
पाणीचोरी करणाऱ्यांवर यापुढेही कारवाई
मुख्य जलवाहिनीतून विनापरवाना पाणी घेणे तसेच तलावातून अनधिकृतरीत्या पाणी उपसण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा स्पष्ट इशारा महानगरपालिका आयुक्त राहुल कुलकर्णी यांनी दिला आहे. आगामी काळात संपूर्ण शहरात अनधिकृत नळजोडण्या आणि विनापरवाना पाणी उपसण्याविरोधातील शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे.
शहरातील नागरिकांना नियमित आणि सुरळीत पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, तसेच अनधिकृत नळजोडण्या अधिकृत करून घ्याव्यात आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis