‘अर्णव’ चक्रीवादळाचा धोका वाढला; 5 राज्यांना सतर्कतेचा इशारा
एनडीआरएफ, लष्कर आणि नौदल सज्ज, मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर (हिं.स.) : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘अर्णव’ चक्रीवादळ अधिक तीव्र होण्याची शक्यता असून, केंद्र सरकारने आंध्र प्रदेश, ओडिशा, तेलंगणा, छत्तीसगड आणि
प्रतिकात्मक उपग्रह छायाचित्र


एनडीआरएफ, लष्कर आणि नौदल सज्ज, मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन

नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर (हिं.स.) : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘अर्णव’ चक्रीवादळ अधिक तीव्र होण्याची शक्यता असून, केंद्र सरकारने आंध्र प्रदेश, ओडिशा, तेलंगणा, छत्तीसगड आणि पुद्दुचेरी येथे सतर्कतेचा इशारा दिला आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, हे चक्रीवादळ 28 ऑक्टोबरच्या सुमारास आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन केंद्र आणि राज्य सरकारांनी बचाव व मदतकार्याची तयारी युद्धपातळीवर सुरू केली आहे.

हवामान विभागाच्या सोमवारच्या बुलेटिननुसार, चक्रीवादळ विशाखापट्टणमपासून सुमारे 650 किलोमीटर पूर्व-दक्षिण-पूर्व दिशेला असून, ताशी 15 किलोमीटर वेगाने पश्चिमेकडे सरकत आहे. सोमवारी मध्यरात्रीपर्यंत त्याची तीव्रता वाढून तीव्र चक्रीवादळात, तर मंगळवारपर्यंत अतितीव्र चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. बापटला आणि विशाखापट्टणमदरम्यान, यानमजवळून ते पुढे सरकण्याचा अंदाज आहे. यावेळी वाऱ्यांचा वेग ताशी 115 ते 125 किलोमीटर, तर झोतांचा वेग ताशी 140 किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो.

केंद्राकडून आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा

मंत्रिमंडळ सचिव टी. व्ही. सोमनाथन यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय संकट व्यवस्थापन समितीची (एनसीएमसी) बैठक घेऊन विविध राज्यांतील तयारीचा आढावा घेण्यात आला. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (एनडीआरएफ) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची (एसडीआरएफ) पथके तैनात करण्यात आली आहेत. भारतीय लष्कर, नौदल, हवाई दल आणि तटरक्षक दलालाही सज्ज ठेवण्यात आले आहे. वीज, पाणी आणि अन्य अत्यावश्यक सेवा सुरळीत ठेवण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.

आंध्र प्रदेश, ओडिशात विशेष खबरदारी

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी प्रशासनाला चोवीस तास सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष सुरू करण्यासह किनारपट्टीवरील नागरिकांना नियमित सूचना देण्यावर भर देण्यात आला आहे. राज्यात एनडीआरएफची 10 पथके तैनात असून, आणखी १६ पथके राखीव ठेवण्यात आली आहेत. मच्छीमारांच्या नौका किनाऱ्यावर आणण्याबरोबरच प्रसूतीची वेळ जवळ आलेल्या गर्भवती महिलांना रुग्णालयांत दाखल करण्याची व्यवस्था केली जात आहे. संभाव्य वीजहानी लक्षात घेऊन 25 हजार वीजखांब आणि आवश्यक साहित्य तयार ठेवण्यात आले आहे.

ओडिशातील गंजाम, गजपती, रायगडा, मलकानगिरी, कोरापुट आणि नबरंगपूर या 6 जिल्ह्यांना संवेदनशील घोषित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी आठ मंत्र्यांवर तयारीची जबाबदारी सोपवली आहे. या भागांत एनडीआरएफ, ओडीआरएएफ, अग्निशमन दल आणि पोलिसांची पथके तैनात करण्यात आली असून, मासेमारी आणि काही पर्यटनस्थळांवरील प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले आहेत.

अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा अंदाज

पश्चिम बंगालमध्ये 28 ते 30 ऑक्टोबरदरम्यान अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. दार्जिलिंग, कालिम्पोंग आणि आसपासच्या भागांत भूस्खलनाचा धोका व्यक्त करण्यात आला आहे. तेलंगणा, छत्तीसगड, झारखंड, बिहार, पूर्व उत्तर प्रदेश, विदर्भ आणि पूर्व मध्य प्रदेशातही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. अंदमान बेटांवर 26 आणि 27 ऑक्टोबरला पाऊस पडण्याची शक्यता असून, तमिळनाडू आणि पुद्दुचेरीतील 9 बंदरांवर चक्रीवादळविषयक इशारा संकेत लावण्यात आले आहेत.

मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन

मच्छीमारांनी 26 ते 29 ऑक्टोबर दरम्यान समुद्रात जाऊ नये, असा सल्ला देण्यात आला आहे. केंद्रीय गृह मंत्रालय, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि हवामान विभाग परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, सुरक्षित ठिकाणी राहावे आणि हवामान विभागाच्या अधिकृत इशाऱ्यांवर लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ---------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande