
श्रीनगर, 27 ऑक्टोबर (हिं.स.) : जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी मंगळवारी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करत 4 नव्या मंत्र्यांचा सरकारमध्ये समावेश केला. शपथ घेणारे चारही मंत्री काश्मीर खोऱ्यातील आहेत. यामध्ये महिला आमदार शमीम फिरदौस यांचाही समावेश आहे.
मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी विद्यमान मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे औपचारिक राजीनामे सादर केले आहेत. त्यामुळे आता सरकारमधील खात्यांचे फेरवाटप आणि मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने आमदार मुबारक गुल यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, आतापर्यंत जवळपास 30 वेळा मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिलो आहे; मात्र दुर्दैवाने यावेळीही मंत्रिमंडळात संधी मिळाली नाही अशा शब्दात त्यांनी आपली खंत व्यक्त केली.
अली मोहम्मद सागर यांची मंत्रिपदाची शपथ
शपथविधी सोहळ्यात नॅशनल कॉन्फरन्सचे ज्येष्ठ नेते आणि सात वेळा आमदार राहिलेले अली मोहम्मद सागर यांनी उर्दू भाषेत पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. आपल्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी आजवर विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करलेला नाही. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी श्रीनगरमधील खानयार मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्यांनी माजी उपमहापौर शेख इमरान यांचा 9912 मतांनी पराभव केला होता.कुपवाडा जिल्ह्यातील त्रेहगाम मतदारसंघाचे आमदार मीर सैफुल्ला यांनी इंग्रजी भाषेत शपथ घेतली. ते उत्तर काश्मीरमधील असून, त्यांनी यापूर्वीही अनेक वेळा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे.
शमीम फिरदौस आणि अल्ताफ अहमद वानी प्रथमच मंत्रिमंडळात
या मंत्रिमंडळ विस्तारात 2 नव्या चेहऱ्यांना प्रथमच मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे. हब्बाकदल मतदारसंघाच्या आमदार आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा शमीम फिरदौस यांनी इंग्रजीतून शपथ घेतली. उमर अब्दुल्ला यांच्या मंत्रिमंडळात सकीना इत्तू यांच्यानंतर त्या दुसऱ्या महिला मंत्री ठरल्या आहेत.
पहलगाम मतदारसंघाचे आमदार अल्ताफ अहमद वानी, ज्यांना ‘कल्लू’ या नावानेही ओळखले जाते, यांनीदेखील प्रथमच मंत्रिपदाची शपथ घेतली. पारंपरिक काश्मिरी कराकुली टोपी परिधान करून ते शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिले. त्यांनी इंग्रजी भाषेत शपथ घेतली.
मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या वाढली
मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी उमर अब्दुल्ला सरकारमध्ये 6 मंत्री होते. जम्मू-काश्मीरच्या 90 सदस्यीय विधानसभेच्या नियमानुसार, मुख्यमंत्र्यांसह मंत्रिपरिषदेतील मंत्र्यांची कमाल संख्या 9 असू शकते. नव्या 4 मंत्र्यांच्या समावेशामुळे मंत्रिमंडळातील रचनेत बदल झाला असून, आता विविध खात्यांचे वाटप कसे केले जाते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.दरम्यान, नॅशनल कॉन्फरन्सचा आघाडीतील सहकारी पक्ष असलेल्या काँग्रेसने सरकारमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा पुन्हा मिळेपर्यंत मंत्रिमंडळात सहभागी होणार नसल्याची भूमिका काँग्रेसने स्पष्ट केली आहे.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी