लातूरमध्ये १३.०८ लाखांचा प्रतिबंधित सुगंधित जर्दा जप्त
लातूर, २६ ऑक्टोबर (हिं.स.)। लातूर शहरातील ताजोदीन बाबा दर्गा परिसरात स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत विक्रीसाठी वाहतूक करण्यात येणारा १० लाख रुपयांहून अधिक किमतीचा प्रतिबंधित सुगंधित जर्दा जप्त केला. या कारवाईत जर्द्यासह वाहतुकीसाठी वापरण्यात येणा
पोलीस कारवाई


लातूर, २६ ऑक्टोबर (हिं.स.)। लातूर शहरातील ताजोदीन बाबा दर्गा परिसरात स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत विक्रीसाठी वाहतूक करण्यात येणारा १० लाख रुपयांहून अधिक किमतीचा प्रतिबंधित सुगंधित जर्दा जप्त केला. या कारवाईत जर्द्यासह वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे टाटा एसीई गोल्ड वाहन असा एकूण १३ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. पोलिसांची चाहूल लागताच वाहनातील दोघांनी अंधाराचा फायदा घेऊन पळ काढला असून, त्यांचा शोध सुरू आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक ताजोदीन बाबा दर्गा परिसरात गस्त घालत असताना दर्ग्यापासून ताजोदीन बाबा नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रतिबंधित सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्रीसाठी वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी संबंधित रस्त्यावर सापळा रचला.

काही वेळातच एमएच २४ एयू ८६३३ क्रमांकाचे पांढऱ्या रंगाचे टाटा एसीई गोल्ड वाहन तेथे आले. पोलिसांनी वाहन थांबविण्याचा इशारा करताच चालक आणि त्याच्यासोबत असलेल्या जुनेद साबेर सिद्दीकी (रा. लेबर कॉलनी, लातूर) यांनी वाहन रस्त्याच्या बाजूला उभे केले आणि अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला.

यानंतर पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता, पिवळ्या रंगाच्या पोत्यांमध्ये विविध कंपन्यांची लेबले असलेले प्रतिबंधित सुगंधित जर्द्याचे पुडे आढळून आले. महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला हा तंबाखूजन्य पदार्थ विक्रीसाठी नेला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. जर्दा आणि त्याच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे वाहन असा एकूण १३ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी लातूर येथील विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १२३, २७४, २७५, २२३ आणि ३(५), तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियमाच्या कलम ५९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपींचा शोध घेण्याची कार्यवाही सुरू आहे.

पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्र, पोलीस अंमलदार अर्जुन राजपूत, रियाज सौदागर, मनोज खोसे आणि प्रवीण कोळसुरे यांचा सहभाग होता.लातूर जिल्ह्यात अवैध धंदे तसेच प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांविरुद्ध कायद्यानुसार कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

--------------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande