
रायगड, २७ ऑक्टोबर (हिं.स.) : आगामी काळात उद्भवणारी संभाव्य पाणीटंचाई रोखण्यासाठी जलजीवन मिशनसह खालापूर तालुक्यातील सर्व पाणीपुरवठा योजनांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करावीत. कामांमध्ये दिरंगाई किंवा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा आमदार महेंद्र थोरवे यांनी दिला.
खालापूर पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित पाणीपुरवठा योजनांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या कामांची सद्यस्थिती, अपूर्ण योजना, तांत्रिक अडचणी आणि आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला.
तालुक्यातील नागरिकांना उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण करावी लागू नये, यासाठी प्रशासनाने आतापासूनच योग्य नियोजन करावे. रखडलेल्या पाणीपुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्ण करून पाणीपुरवठ्यातील अडथळे दूर करावेत. ज्या गावांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत नाही, तेथील समस्या प्राधान्याने सोडवाव्यात, असे निर्देश थोरवे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
पाणीपुरवठा हा नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करावे. योजनांच्या अंमलबजावणीत येणाऱ्या तांत्रिक व प्रशासकीय अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल; मात्र, संबंधित अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडून कामांना गती द्यावी, असेही आमदार थोरवे यांनी स्पष्ट केले.
या बैठकीला तहसीलदार अभय चव्हाण, नायब तहसीलदार सुधाकर राठोड, गटविकास अधिकारी संदीप कराड, पंचायत समिती सभापती कृष्णा पारंगे, उपसभापती भाई शिंदे, जिल्हा परिषद सदस्या रेश्मा पाटील, पंचायत समिती सदस्य रितेश जाधव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)