

रायगड, 27 ऑक्टोबर (हिं.स.)।
दिवाळीच्या सणासुदीच्या काळात अन्नपदार्थांच्या गुणवत्तेची तपासणी करताना अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पनवेल येथील जवाहर सहकारी औद्योगिक वसाहतीतील अजफान इंटरनॅशनल रिटेल्स एलएलपी या कंपनीवर छापा टाकला. या कारवाईत ४ कोटी २१ लाख ६ हजार ९६१ रुपये किमतीचा अन्नसाठा जप्त करण्यात आला. अन्नपदार्थांच्या लेबलिंग व नामनिर्देशनातील त्रुटी आणि गुणवत्तेबाबत संशय आढळल्याने ही कारवाई करण्यात आली.
तपासणीदरम्यान संबंधित अन्नपदार्थ चुकीच्या नामनिर्देशनाचे (मिसब्रँडेड) असल्याचे तसेच ते निकृष्ट दर्जाचे असण्याची शक्यता निदर्शनास आली. याप्रकरणी अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ मधील कलम २३, २६ आणि २७ अंतर्गत तरतुदींच्या उल्लंघनाच्या अनुषंगाने पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
सहायक आयुक्त (अन्न) ए. ए. मैत्रे आणि एम. आर. महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सहआयुक्त (अन्न) सचिन जाधव यांच्या देखरेखीखाली पुढील कार्यवाही सुरू आहे.दिवाळी आणि आगामी सणांच्या काळात मिठाई, खाद्यतेल, मसाले यांसह विविध अन्नपदार्थांची मागणी वाढते. या पार्श्वभूमीवर ग्राहकांना सुरक्षित व दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी एफडीए कडून विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.
अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध नियमानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. ग्राहकांनीही अन्नपदार्थ खरेदी करताना उत्पादनाची आणि अंतिम वापराची तारीख तसेच लेबलवरील माहिती तपासावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)