

रायगड, 27 ऑक्टोबर (हिं.स.)। महानगर गॅस लिमिटेड (एमजीएल)तर्फे आपत्कालीन परिस्थितीतील प्रतिसाद क्षमता तपासण्यासाठी विळे भागाड येथील सिटी गेट स्टेशन परिसरातील सीएनजी रिटेल आउटलेटमध्ये लेव्हल-३ आपत्कालीन मॉक ड्रिल आयोजित करण्यात आली.
या सरावात सीएनजी कंप्रेसर क्षेत्राजवळ गॅसगळती होऊन फिल्ट्रेशन स्किडला आग लागल्याची काल्पनिक परिस्थिती निर्माण करण्यात आली. या वेळी विविध यंत्रणांचा प्रतिसाद, समन्वय आणि आपत्कालीन उपाययोजनांची परिणामकारकता तपासण्यात आली.
या मॉक ड्रिलमध्ये अग्निशमन दल, पोलीस, वाहतूक पोलीस, म्युच्युअल एड रिस्पॉन्स ग्रुप (मार्ग), जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि १०८ आपत्कालीन वैद्यकीय सेवा यंत्रणेने सहभाग घेतला. तसेच आर्सेलर मित्तल, पॉस्को महाराष्ट्र स्टील लिमिटेड, आयनॉक्स एअर प्रॉडक्ट्स लिमिटेड यांसह परिसरातील विविध उद्योगांचे प्रतिनिधीही सहभागी झाले.
सराव पूर्ण झाल्यानंतर संबंधित यंत्रणांच्या प्रतिनिधींनी त्याचे मूल्यांकन केले. आपत्कालीन परिस्थिती अधिक प्रभावीपणे हाताळण्यासाठी आवश्यक सुधारणांबाबत सूचना मांडण्यात आल्या. एमजीएलने केलेल्या आपत्कालीन व्यवस्थापनाच्या उपाययोजनांचे संबंधित प्राधिकरणांनी कौतुक केले. या सरावातून औद्योगिक सुरक्षितता, आपत्ती व्यवस्थापन आणि नागरिकांच्या संरक्षणासाठी विविध यंत्रणांमधील समन्वयाचे महत्त्व अधोरेखित झाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)