
अम्मान, 27 ऑक्टोबर (हिं.स.)। जॉर्डनची राजधानी अम्मानच्या दक्षिणेला असलेल्या करक शहरातील ग्रीक ऑर्थोडॉक्स चर्चवर गेल्या आठवड्यात प्राणघातक हल्ला झाला होता. या हल्ल्यात नऊ जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून जॉर्डनने आता सीरियावर हवाई हल्ले केले आहेत. मंगळवारी जॉर्डनने दक्षिण सीरियातील सशस्त्र गटांना लक्ष्य करत हवाई कारवाई केली. सीरियाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या हल्ल्यांमध्ये सुमारे सात नागरिकांचा मृत्यू झाला.
सीरियाच्या नागरी संरक्षण संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिणेकडील दारा आणि सुवेदा या प्रांतांमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यांत सात जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा समावेश आहे. त्यात तीन मुले आणि एका महिलेचा समावेश होता. संस्थेच्या माहितीनुसार, दारा प्रांतातील ग्रामीण भागात उभारलेल्या एका तंबूवर हवाई हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात संबंधित कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला, तर कुटुंबातील अन्य तीन सदस्य जखमी झाले. याशिवाय, वेगवेगळ्या हल्ल्यांमध्ये ८० आणि ६० वर्षांच्या दोन ज्येष्ठ नागरिकांचाही मृत्यू झाला.
जॉर्डनच्या हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईत लक्ष्य करण्यात आलेल्या सशस्त्र गटांचे अनेक सदस्य मारले गेले किंवा जखमी झाले. तसेच अनेक वाहने नष्ट करण्यात आली. मात्र, या सशस्त्र गटांची ओळख आणि हल्ल्यांची नेमकी ठिकाणे याबाबत जॉर्डनच्या हवाई दलाने माहिती दिलेली नाही.शुक्रवारी करक शहरातील ग्रीक ऑर्थोडॉक्स चर्चमध्ये अंत्यसंस्कार सुरू असताना बंदूकधाऱ्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात नऊ जणांचा मृत्यू झाला, तर २४ हून अधिक जण जखमी झाले होते. हे शहर जॉर्डनची राजधानी अम्मानपासून सुमारे ९० किलोमीटर दक्षिणेला आहे.
सोमवारी पहाटे झालेल्या गोळीबारानंतर जॉर्डनच्या अधिकाऱ्यांनी या हल्ल्याच्या प्रकरणात तीन जणांना अटक केली. कारवाईदरम्यान हे तिघेही जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना करक शहरात ताब्यात घेण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode