
वॉशिंग्टन , 27 ऑक्टोबर (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी, २६ ऑक्टोबर रोजी ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप केला. मात्र, या आरोपांच्या समर्थनार्थ त्यांनी कोणताही पुरावा दिला नाही. डाव्या विचारसरणीचे नेते लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांनी ही निवडणूक जिंकली आहे.
मेरीलँड येथील पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले, “खरे सांगायचे तर, ही आणखी एक गैरप्रकारांनी भरलेली निवडणूक असल्याचे वाटले. मी कोणाचीही बाजू घेतली नाही; मात्र, यामुळे जगासमोर अत्यंत वाईट चित्र निर्माण होते. निवडणुका अशा असायला हव्यात की त्यांच्यावर कोणताही प्रश्न उपस्थित होऊ नये. मला मात्र हे अत्यंत वाईट वाटले.”ट्रम्प यांना निवडणुकीबाबत ते काही कारवाई करणार आहेत का, असे विचारले असता त्यांनी उत्तर दिले, “मी ब्राझील चालवत नाही, तर अमेरिकेचे नेतृत्व करत आहे.”
लुला दा सिल्वा यांनी उजव्या विचारसरणीचे प्रतिस्पर्धी फ्लाव्हिओ बोल्सोनारो यांचा पराभव करून चौथ्यांदा सत्तेत पुनरागमन केले आहे. वृत्तानुसार, ट्रम्प यांनी कोणत्याही उमेदवाराला उघडपणे पाठिंबा दिला नसला, तरी अनेक प्रसंगी त्यांनी बोल्सोनारो यांची बाजू घेतली होती. निवडणुकीबाबत ट्रम्प म्हणाले, “मी कोणाचीही बाजू घेतली नाही किंवा कोणालाही पाठिंबा दिला नाही. मात्र, मी ही निवडणूक पाहिली आणि ती अत्यंत भ्रष्ट असल्याचे वाटले. हे अतिशय भयानक आहे.”
दरम्यान, बोल्सोनारो यांनी आपला पराभव स्वीकारण्यास नकार दिला असून, निवडणुकीचे निकाल रद्द करण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे, ब्राझीलच्या एका अधिकाऱ्याने अमेरिकेकडून अखेरीस लुला यांच्या विजयाला मान्यता दिली जाईल, असा ठाम विश्वास व्यक्त केला. मतदानाच्या आकडेवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे कठीण असल्याचेही त्यांनी सांगितले.
हा अधिकारी पुढे म्हणाला, “ट्रम्प यांनी विजयाला मान्यता दिली नाही, तर काय होईल? जास्तीत जास्त आम्ही अमेरिकेशी राजनैतिक संबंध तोडू शकतो. मात्र, त्याचा फायदा चीनला होईल. अमेरिका ब्राझीलवर हल्ला करून येथे आपल्या मर्जीतील सरकार स्थापन करणार नाही. आम्ही व्हेनेझुएला नाही. आमचे सरकार कायम राहील.”
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode