मेलानिया ट्रम्प यांच्या पुढाकाराने ओलेश्कीतील नागरिकांसाठी रशिया-युक्रेनचा तात्पुरता युद्धविराम
कीव, 27 ऑक्टोबर (हिं.स.) ।रशिया आणि युक्रेन यांच्यात मंगळवारी पहाटे स्थानिक पातळीवर युद्धविराम लागू झाला. अमेरिकेच्या प्रथम महिला मेलानिया ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात येणाऱ्या मानवतावादी मदत मोहिमेपूर्वी हा निर्णय घेण्यात आला आहे. युक्रे
Temporary Russia-Ukraine ceasefire for the residents of Oleshky, initiated by Melania Trump


कीव, 27 ऑक्टोबर (हिं.स.) ।रशिया आणि युक्रेन यांच्यात मंगळवारी पहाटे स्थानिक पातळीवर युद्धविराम लागू झाला. अमेरिकेच्या प्रथम महिला मेलानिया ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात येणाऱ्या मानवतावादी मदत मोहिमेपूर्वी हा निर्णय घेण्यात आला आहे. युक्रेनच्या स्थानिक वेळेनुसार पहाटे तीन वाजता युद्धविराम सुरू झाला. या आठवड्याच्या अखेरीस दक्षिण युक्रेनमधील रशियाच्या ताब्यात असलेल्या ओलेश्की शहरात मदतसामग्री पोहोचवण्याचा मार्ग मोकळा करणे, हा या युद्धविरामाचा उद्देश आहे.

मेलानिया ट्रम्प यांच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, संयुक्त राष्ट्रांच्या अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी रशिया आणि युक्रेनमधील नागरी प्रतिनिधींच्या चर्चेचे नेतृत्व केले. संयुक्त राष्ट्रांच्या अधिकाऱ्यांनी त्यांना शहरातील परिस्थितीची माहिती दिली होती. हा युद्धविराम शनिवारपर्यंत सुरू राहण्याची अपेक्षा आहे. गरज भासल्यास त्याची मुदत आणखी वाढवली जाऊ शकते.मात्र, रशिया आणि युक्रेन यांच्यातील तीव्र अविश्वासामुळे यापूर्वीही युद्धविरामाचे प्रयत्न यशस्वी ठरलेले नाहीत.

संयुक्त राष्ट्रांच्या माहितीनुसार, ओलेश्की शहरात सुमारे दोन हजार नागरिक अडकले आहेत. तेथील अन्नधान्य आणि औषधांचा साठा सातत्याने कमी होत आहे. परिसरात भूसुरुंग आणि ड्रोन हल्ल्यांचा धोका असल्याने नागरिकांना शहर सोडून जाता येत नाही.मदत मोहिमेशी संबंधित चर्चेत सहभागी असलेल्या प्रतिनिधींनी सांगितले की, नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी मार्गिका खुल्या करण्यापूर्वी ओलेश्की शहरात डॉक्टर, औषधे, अन्न आणि पाणी यांचा पुरवठा केला जाणार आहे.

ओलेश्की हे शहर अंशतः रशियाच्या ताब्यात असलेल्या खेरसॉन प्रदेशात आहे. युक्रेनची राजधानी कीवपासून ते सुमारे ५५० किलोमीटर आग्नेय दिशेला आहे. या भागात नीपर नदी रशिया आणि युक्रेनच्या सैन्यादरम्यानची सीमारेषा म्हणून काम करते. रशियन सैन्याने २०२२ मध्ये युक्रेनवर मोठ्या प्रमाणावर आक्रमण सुरू केले, त्याच पहिल्या दिवशी ओलेश्की शहरावर ताबा मिळवला होता.जून २०२३ मध्ये धरण फुटल्यामुळे आलेल्या पुराने या शहरात मोठी हानी झाली होती.

ओलेश्की हे खेरसॉन शहराच्या समोर, नीपर नदीच्या पलीकडे वसलेले आहे. खेरसॉन प्रदेशाची प्रशासकीय राजधानी असलेल्या या शहरावरही रशियन सैन्याने २०२२ मध्ये आक्रमणाच्या सुरुवातीच्या दिवसांत ताबा मिळवला होता.मात्र, काही महिन्यांनंतर रशियन सैन्याने नदीच्या दुसऱ्या बाजूला माघार घेतली होती.रशिया आणि युक्रेन यांच्यात पुढील महिन्यात संभाव्य चर्चा होण्यापूर्वी या मानवतावादी मदत मोहिमेची योजना आखण्यात आली आहे. अमेरिकेच्या मध्यस्थीने होणाऱ्या या चर्चांचा उद्देश साडेचार वर्षांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपवण्याचा मार्ग शोधणे हा आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande