हुथींसोबत युद्धविरामासाठी सौदीची १ अब्ज डॉलर्सची ऑफर
रियाध , 27 ऑक्टोबर (हिं.स.)।इराणसमर्थित हुथी बंडखोरांकडून सौदी अरेबियावर सातत्याने हल्ले केले जात आहेत. या हल्ल्यांना रोखण्यात सौदी अरेबियाची हवाई संरक्षण यंत्रणाही अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे. बंडखोरांचे हल्ले थांबवण्यासाठी सौदी अरेबियाने हुथींना
हुथींसोबत युद्धविरामासाठी सौदीची १ अब्ज डॉलर्सची ऑफर


रियाध , 27 ऑक्टोबर (हिं.स.)।इराणसमर्थित हुथी बंडखोरांकडून सौदी अरेबियावर सातत्याने हल्ले केले जात आहेत. या हल्ल्यांना रोखण्यात सौदी अरेबियाची हवाई संरक्षण यंत्रणाही अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे. बंडखोरांचे हल्ले थांबवण्यासाठी सौदी अरेबियाने हुथींना मोठी आर्थिक मदत देण्याची तयारी दर्शविल्याचा दावा इस्रायली माध्यमांनी केला आहे.

माध्यमांच्या वृत्तानुसार, सौदी अरेबियाचे संरक्षणमंत्री प्रिन्स खालिद बिन सलमान हे हुथी बंडखोरांसोबत युद्धविराम घडवून आणण्यासाठी चर्चा करण्याच्या उद्देशाने तेहरानला गेले होते. इराणच्या मध्यस्थीने होणाऱ्या कराराचा हा प्रस्ताव असल्याचे सांगितले जात आहे. सौदी अरेबियाने हुथींना एक अब्ज अमेरिकी डॉलर देण्याची तयारी दर्शविल्याचा दावा करण्यात आला आहे.

एका राजनैतिक सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, सौदीचे संरक्षणमंत्री ज्या ‘हर्क्युलिस’ लष्करी मालवाहू विमानातून तेहरानला पोहोचले, त्याच विमानातून त्यांनी ही रक्कमही आणली होती. मात्र, कोणतीही रक्कम हस्तांतरित करण्यात आल्याच्या वृत्ताला सौदीच्या कोणत्याही अधिकाऱ्याने दुजोरा दिलेला नाही.या चर्चेत तुर्कीचे गुप्तचर विभागाचे प्रमुख इब्राहिम कालिन आणि पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल आसिम मुनीर सहभागी झाल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्यासोबत इराणचे अधिकारीही उपस्थित होते. यामध्ये इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान, सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे महासचिव मोहसेन रेजाई आणि इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सचे वरिष्ठ अधिकारी यांचा समावेश होता.

वृत्तानुसार, सौदी अरेबियातील विमानतळे आणि तेल प्रकल्पांवरील हल्ले वाढत असताना इराणने सौदी अरेबिया आणि हुथी बंडखोरांमध्ये मध्यस्थी करण्याची तयारी दर्शविली आहे. या हल्ल्यांमुळे सौदी अरेबियाला आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. त्याचबरोबर, होर्मुझच्या सामुद्रधुनीत तेलवाहू जहाजांवर इराणकडून करण्यात आलेल्या हल्ल्यांमुळे आखाती प्रदेशातून होणाऱ्या तेलाच्या निर्यातीवरही परिणाम झाला आहे.सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने या दौऱ्याबाबत अधिकृत निवेदन जारी केले आहे. त्यात म्हटले आहे, “संरक्षणमंत्री प्रिन्स खालिद बिन सलमान आणि ‘मक्का संयुक्त संरक्षण आघाडी’च्या सदस्य देशांच्या प्रतिनिधींचा तेहरान दौरा हा सध्याच्या संकटाशी संबंधित पक्षांमधील तणाव कमी करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. संवाद आणि राजनैतिक तोडग्याला प्रोत्साहन देणे, तसेच कतार आणि पाकिस्तानकडून सुरू असलेल्या मध्यस्थीच्या प्रयत्नांना पाठिंबा देणे, हा या दौऱ्याचा उद्देश आहे.”

इस्रायली माध्यमांशी बोलताना सौदी अरेबियाच्या एका अधिकाऱ्याने कथित आर्थिक व्यवहाराला दुजोरा दिला नसला, तरी हुथी बंडखोरांसोबतच्या वादाचा एक भाग तीन वर्षांपूर्वी झालेल्या करारांची अंमलबजावणी करण्याशी संबंधित असल्याचे सांगितले. या करारांनुसार, वाद सोडवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून सौदी अरेबियाने हुथींना थेट आर्थिक मदत द्यायची होती. या निधीचा वापर प्रामुख्याने हुथींच्या नियंत्रणाखालील भागांमधील सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी आणि सामान्य नागरिकांसाठी पायाभूत सुविधांची पुनर्बांधणी करण्यासाठी केला जाणार होता.

या आर्थिक मदतीच्या बदल्यात हुथी बंडखोरांनी युद्धविरामाचे पालन करावे आणि सौदी अरेबियावरील हल्ले थांबवावेत, अशी अपेक्षा होती.मात्र, अलीकडच्या काही महिन्यांत हुथी बंडखोरांनी आपल्या हल्ल्यांचे समर्थन करताना सौदी अरेबियाने पूर्वी झालेल्या करारांमधून माघार घेतल्याचा आरोप केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande