
रायगड, 27 ऑक्टोबर (हिं.स.)। कर्जत तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी भागांत पाणीटंचाई, चारा टंचाई आणि शेतीच्या नुकसानीमुळे नागरिक त्रस्त असल्याचा दावा क्रांतिज्योती आदिवासी महिला सामाजिक संस्थेने केला आहे. दुष्काळी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप करत, दिवाळीनंतर कर्जत प्रांत कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा संस्थेच्या अध्यक्षा इंदू वसंत केवारी यांनी दिला.
संस्थेने प्रांताधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या नऊ कलमी निवेदनात नद्या-नाल्यांचे खोलीकरण, टँकरने पाणीपुरवठा, बाधित शेतकऱ्यांना ५० हजार रुपये व शेतमजुरांना २५ हजार रुपयांची मदत, विद्यार्थ्यांची शुल्कमाफी, रेशनवर तेल-साखर, भटक्या कुटुंबांना मदत आणि संपूर्ण कर्जमाफीच्या मागण्या केल्या आहेत. मात्र, या मागण्या अद्याप पूर्ण झालेल्या नसल्याचे संस्थेचे म्हणणे आहे.
कशेळे परिसरात पाणीटंचाई, जनावरांसाठी चाऱ्याची कमतरता, भात, नाचणी व वरी पिकांचे नुकसान आणि रेशनवर पुरेसे धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी असल्याचे संस्थेने म्हटले आहे. दुष्काळी उपाययोजनांच्या अंमलबजावणीत विलंब होत असल्याचा आरोप करून पात्र लाभार्थ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी केवारी यांनी केली. यावेळी सचिव जीजा दरवडा, प्रमिला पादीर, कोमल भगत आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)