
अकोला, 28 ऑक्टोबर (हिं.स.)।
महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणूकीत अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून शिवसेना पक्षाचे उमेदवार सरनाईक किरण रामराव १६ हजार ६६३ मते मिळवून विजयी झाले. त्यांचे नजिकचे प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या अदिती ऋषिकेश पोहरे यांना ८ हजार ६३६ मते मिळाली.
या निवडणुकीसाठी शुक्रवार २३ ऑक्टोबर रोजी विभागातील ५ जिल्ह्यातील ८१ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली होती. ३५ हजार ८१० मतदारांपैकी ९२.२५ टक्के म्हणजे ३३ हजार ३४ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
अमरावती येथील 'लोकशाही भवन' या इमारतीत मंगळवार २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता मतमोजणी प्रक्रीयेस प्रारंभ झाला. निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त श्रीमती नयना गुंडे , निवडणूक निरीक्षक अभय महाजन, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी आशिष येरेकर (अमरावती), वर्षा मीना (अकोला), योगेश कुंभेजकर (वाशिम), विकास मीना (यवतमाळ), प्रविणकुमार देवरे (बुलढाणा) तसेच इतर नियुक्त अधिकारी व कर्मचारी तसेच उमेदवारांचे मतमोजणी प्रतिनिधी मतमोजणी केंद्रात उपस्थित होते.
प्रारंभी उमेदवारांना मिळालेल्या पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी एकुण तीन फेऱ्यात करण्यात आली. १४-१४ हजार आणि शेवटी ५ हजार ३४ याप्रमाणे मतपत्रिकांची तीन फेऱ्यांमध्ये यावेळी मतमोजणी करण्यात आली. या मतमोजणीत तिन्ही फेरीमध्ये शिवसेनेचे उमेदवार किरण सरनाईक हे कायम आघाडीवर होते. त्यांना पहिल्या पसंतीची एकुण ८ हजार १६२ मते प्राप्त झाली. त्यांच्या निकटच्या प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या उमेदवार अदिती पोहरे यांना ४ हजार ६८८ मते मिळाली. दोन फेरीत दुसऱ्या क्रमांकावर असलेले अपक्ष श्रीकांत देशपांडे यांची तिसऱ्या फेरीअखेर तिसऱ्या स्थानी घसरण झाली व त्यांना ४ हजार ६६८ मते मिळाली.
पहिल्या पसंतीच्या मतमोजणीच्या तिसऱ्या फेरीअखेर एकूण ३३ हजार ३४ मतांची मोजणी करण्यात आली. एकूण ३२ हजार २६६ मते वैध तर ७६८ मते अवैध ठरली. विजयासाठी आवश्यक मतांचा कोटा हा १६ हजार १३४ मते इतका ठरला. विजयासाठी आवश्यक मते (कोटा) पहिल्या पसंतीच्या मतमोजणीनंतर एकही उमेदवार पूर्ण करू शकला नसल्याने दुसऱ्या पसंतीक्रमाच्या मतमोजणीला सुरुवात करण्यात आली.
तिसऱ्या आणि अंतिम फेरीअखेर पहिल्या पसंतीची प्रमुख दहा उमेदवारांना मिळालेली मते अशी आहेत. शिवसेनेचे किरण सरनाईक यांना ८१६२, काँग्रेसच्या अदिती पोहरे यांना ४६८८, अपक्ष डॉ. श्रीकांत देशपांडे यांना ४६६८, अपक्ष सुरेश देवकर यांना ३२३६, अपक्ष दिलीप कडू यांना २६७४, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे दत्तात्रय लहाने यांना २१५५, अपक्ष डॉ. सौ.संगीता शिंदे यांना १९६४, अपक्ष चंद्रशेखर भोयर यांना १३७५, अपक्ष डॉ. प्रशांत विघे यांना १२६७ तर अपक्ष डॉ.अविनाश बोर्डे यांना १०२६ मते प्राप्त झाली.
विद्यापीठ मार्गावरील लोकशाही भवनात मंगळवारी सकाळी ८ वाजता मतमोजणीची प्रक्रिया सुरू झाली. मतपत्रिकांचे २५-२५ च्या गठ्ठ्यांमध्ये वर्गीकरण केल्यानंतर दुपारी १२ च्या सुमारास २४ टेबलवर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या पसंतीक्रमाच्या तीन फेरीतील ३३ हजार ३४ मतपत्रिकांची मोजणी पूर्ण होण्यासाठी सुमारे साडेदहा तासांचा अवधी लागला. पहिल्या पसंतीक्रमाच्या मतांनंतर विजयासाठी आवश्यक असलेला निश्चित कोटा पूर्ण न झाल्याने दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरू करावी लागली. विजयाच्या अंतिम निकालासाठी दुसऱ्या पसंतीक्रमाच्या मतांची मोजणी तब्बल ३३ तास म्हणजे दुसऱ्या दिवशी बुधवार २८ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ५ वाजेपर्यंत चालली त्यानंतरच अंतिम चित्र स्पष्ट झाले.
अपेक्षित मतांचा कोटा पूर्ण न झाल्याने दुसऱ्या पसंतीक्रमाच्या मतांची मोजणी करून २६ पैकी २४ उमेदवारांना बाद फेरीत बाद करीत त्या-त्या उमेदवाराला मते वर्ग करण्यात आली. त्यामुळे निवडणूक निकाल अधिक शिगेला पोहोचला.
शिवसेनेचे विजयी उमेदवार सरनाईक किरण रामराव यांना भारत निवडणूक आयोगाच्या वतीने निवडणूकीत विजयी झाल्याचे घोषित करून यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त श्रीमती नयना गुंडे आणि निवडणूक निरीक्षक अभय महाजन यांनी त्यांना प्रमाणपत्र प्रदान केले.
बाद फेरीअखेर दुसऱ्या पसंतीची इतरांची मते समाविष्ट झाल्यानंतर. त्या-त्या बाद फेरीअखेर सर्वाधिक मते मिळविण्या-या दोन उमेदवाराव्यतिरिक्त सर्व २४ उमेदवार क्रमाने बाद होत गेले आणि त्यांच्या मतपत्रिकेतील दुसऱ्या पसंतीक्रमाची मते त्या-त्या उमेदवाराकडे वर्ग होत गेली. त्यामुळे सर्वाधिक मते मिळवणा-या व अपेक्षित कोटा पूर्ण करणा-या उमेदवाराला शेवटी विजयी घोषित करण्यात आले. या निवडणूक निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. डॉ. श्रीकांत देशपांडे यांच्या ७०१७ मतांमधून २४ व्या बाद फेरीअखेर दुसऱ्या पसंतीची ३००२ मते घेवून सरनाईक यांनी विजयासाठी आवश्यक असलेला १६१३४ मतांचा कोटा पुर्ण करीत १६६६३ मते घेतली.
संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततामय वातावरणात पार पाडण्यासाठी सहकार्य केलेल्या सर्व अधिकारी- कर्मचारी, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणा-या पोलीस यंत्रणेचे तसेच प्रसार माध्यम प्रतिनिधींचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त श्रीमती नयना गुंडे यांनी यावेळी जाहीर आभार व्यक्त केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे