महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक निकाल : शिक्षक मतदारसंघांत महायुतीची बाजी
नागपूर पदवीधर मतदारसंघांत चुरशीचा सामना पुणे शिक्षक मतदारसंघातून भाजपचे कौस्तुभ गावडे अमरावतीत शिवसेनेचे किरण सरनाईक विजयी पुणे व मराठवाडा पदवीधरमध्ये मविआचे उमेदवार विजयी मुंबई, २८ ऑक्टोबर : महाराष्ट्र विधान परिषदेच्या 3 पदवीधर आणि 2 शिक्षक
मतदान लोगो


नागपूर पदवीधर मतदारसंघांत चुरशीचा सामना

पुणे शिक्षक मतदारसंघातून भाजपचे कौस्तुभ गावडे

अमरावतीत शिवसेनेचे किरण सरनाईक विजयी

पुणे व मराठवाडा पदवीधरमध्ये मविआचे उमेदवार विजयी

मुंबई, २८ ऑक्टोबर : महाराष्ट्र विधान परिषदेच्या 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीचे निकाल बुधवारी स्पष्ट होऊ लागले. दीर्घकाळ चाललेल्या मतमोजणीनंतर पुणे शिक्षक आणि अमरावती शिक्षक मतदारसंघांत महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळवला. दुसरीकडे, पुणे पदवीधर आणि छत्रपती संभाजीनगर (मराठवाडा) पदवीधर मतदारसंघांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाने बाजी मारली. नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचे सुधाकर कोहळे आणि काँग्रेसचे विद्यमान आमदार अभिजीत वंजारी यांच्यात अटीतटीची लढत झाली.

अधिकृत विजय जाहीर झालेले उमेदवार

पुणे शिक्षक मतदारसंघ — कौस्तुभ गावडे (भाजप): भाजपचे कौस्तुभ गावडे यांनी शिवसेना समर्थित अपक्ष उमेदवार सचिन सानप आणि काँग्रेसचे विद्यमान आमदार जयंत आसगावकर यांना मागे टाकत विजय मिळवला. २८ फेऱ्यांनंतर गावडे यांना २३,११७ मते, तर सानप यांना १६,३४७ मते मिळाली.

अमरावती शिक्षक मतदारसंघ — किरण सरनाईक (शिवसेना, शिंदे गट): महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांनी विजय मिळवला. त्यांना १६,६६३ मते मिळाली. काँग्रेसच्या अदिती पोहरे दुसऱ्या क्रमांकावर राहिल्या.

पुणे पदवीधर मतदारसंघ — हर्षदा देशमुख-जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गट): हर्षदा देशमुख-जाधव यांनी भाजपच्या स्मिता जाधव यांचा पराभव केला. त्यांना १,१३,०९५ मते मिळाली असून विजयाचे अंतर सुमारे ९,७०० मतांचे असल्याचे वृत्त आहे.

छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघ — डॉ. प्रतापसिंह पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गट): डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांना पराभूत केले. सलग तीन वेळा या मतदारसंघातून निवडून आलेल्या चव्हाण यांना या वेळी पराभवाचा धक्का बसला.

नागपूर पदवीधर मतदारसंघात चुरशीची लढत

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात भाजपचे सुधाकर कोहळे आणि काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांच्यात प्रतिष्ठेची लढत झाली. मतमोजणीच्या उपलब्ध टप्प्यांमध्ये कोहळे यांनी वंजारी यांच्यावर सुमारे ४,२०० मतांची आघाडी घेतली होती. अपक्ष उमेदवार नितेश कराळे यांनाही लक्षणीय मते मिळाली.

महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये विभागलेले यश

या निवडणुकीत शिक्षक मतदारसंघांमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांनी विजय मिळवला, तर पुणे आणि छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघांत शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळाले. त्यामुळे 5 मतदारसंघांतील लढतींनी राज्यातील सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा अधोरेखित केला.

--------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande