अल-कायदाशी संबंधित अल-शबाब गटाचा सोमालियाच्या लष्करी ताफ्यावर हल्ला; २० सैनिकांचा मृत्यू
मोगादिशू, 28 ऑक्टोबर (हिं.स.)।इस्लामी कट्टरपंथी दहशतवाद्यांनी सोमालियाच्या सैनिकांवर अचानक केलेल्या हल्ल्यात किमान २० सैनिकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यातून बचावलेल्या एका लष्करी अधिकाऱ्याने ही माहिती दिली. सोमालिया सरकारने लष्करी वाहनांचे नुकसान
अल-कायदाशी संबंधित अल-शबाब गटाचा सोमालियाच्या लष्करी ताफ्यावर हल्ला; २० सैनिकांचा मृत्यू


मोगादिशू, 28 ऑक्टोबर (हिं.स.)।इस्लामी कट्टरपंथी दहशतवाद्यांनी सोमालियाच्या सैनिकांवर अचानक केलेल्या हल्ल्यात किमान २० सैनिकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यातून बचावलेल्या एका लष्करी अधिकाऱ्याने ही माहिती दिली. सोमालिया सरकारने लष्करी वाहनांचे नुकसान झाल्याचे मान्य केले असले, तरी सैनिकांच्या मृत्यूबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.

अल-कायदाशी संबंधित असलेल्या अल-शबाब या दहशतवादी संघटनेने दक्षिण सोमालियातील जामिका गावाजवळ सोमवारी झालेल्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली पआहे. ही संघटना गेल्या दोन दशकांपासून सोमालिया सरकारविरोधात लढत आहे.

संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, अनेक तास चाललेल्या चकमकीत सोमालियाच्या सैनिकांनी सुमारे ७५ दहशतवाद्यांना ठार केले, तर ५६ जणांना जखमी केले.

दुसरीकडे, अल-शबाबने या हल्ल्यात एकूण ३२१ सैनिकांना ठार केल्याचा दावा केला आहे. तसेच काही सैनिकांना बंदी बनवल्याचे आणि लष्करी उपकरणे ताब्यात घेतल्याचेही संघटनेने म्हटले आहे. मात्र, मृतांची संख्या, बंदी बनवलेल्या सैनिकांची माहिती आणि लष्करी उपकरणे ताब्यात घेतल्याच्या दाव्यांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही.

लष्करी ताफ्यासोबत प्रवास करणारे अधिकारी अब्शीर अब्दिकरीम यांनी मंगळवारी रात्री उशिरा दूरध्वनीवरून वृत्तसंस्थेला माहिती दिली. हल्ल्यानंतर त्यांनी आपल्या किमान २० सहकारी सैनिकांचे मृतदेह पाहिल्याचे त्यांनी सांगितले.त्यांच्या म्हणण्यानुसार, सैनिक लीगो येथून पुढे जात सोमालियातील बे प्रदेशाच्या बुर्हाकाबा जिल्ह्यातील जामिका येथे पोहोचले होते. तेथे त्यांची दहशतवाद्यांशी भीषण चकमक झाली. बेपत्ता असल्याचे सांगितले गेलेले काही सैनिक मंगळवारी बालेडोग्ले येथे पोहोचले, तर उर्वरित सैनिकांचा अद्याप शोध लागलेला नाही.

अल-शबाबने दावा केला की, त्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या भागात लष्करी ताफ्यावर अचानक हा हल्ला करण्यात आला. संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी लष्करी वाहनांवर हल्ला करण्यासाठी स्फोटकांनी भरलेल्या वाहनांचा वापर केला. या हल्ल्यात लष्कराची काही वाहने नुकसानग्रस्त झाली. मात्र, किती वाहनांचे नुकसान झाले, याची माहिती मंत्रालयाने दिली नाही. तसेच सैनिकांना ओलीस ठेवल्याच्या दाव्यांवरही कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

आफ्रिकन संघाच्या सैन्याने २०११ मध्ये अल-शबाबला सोमालियाची राजधानी मोगादिशूमधून हुसकावून लावले होते. मात्र, त्यानंतर या संघटनेने गनिमी काव्याने लढाई, आत्मघाती हल्ले आणि लक्ष्यित हत्या यांसारख्या मार्गांचा अवलंब करून पुन्हा आपले अस्तित्व मजबूत केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande