
वॉशिंग्टन, 28 ऑक्टोबर (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला आहे की, त्यांच्या पाठिंब्यामुळे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना इस्रायलच्या २६व्या संसदीय निवडणुकीत अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करता आली. ट्रम्प यांच्या मते, त्यांच्या पाठिंब्यामुळे नेतान्याहू यांच्या बाजूने निवडणुकीचे चित्र बदलले.
प्राथमिक निकालांनुसार, नेतान्याहू यांच्या समर्थक आघाडीने आघाडी घेतली आहे. मात्र, सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेले बहुमत अद्याप त्यांना मिळालेले नाही. सकाळी ७.५८ वाजेपर्यंत ५७.३ टक्के मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर केंद्रीय निवडणूक समितीने जाहीर केलेल्या प्राथमिक आकडेवारीनुसार, नेतान्याहू समर्थक गटाला ५५ जागा, तर त्यांच्या विरोधातील गटाला ४९ जागा मिळाल्या आहेत. अरब पक्षांना १६ जागा मिळण्याचा अंदाज आहे. दरम्यान, रिझर्व्हिस्ट (२.६ टक्के), पीपल ऑफ इस्रायल (१.७ टक्के) आणि चारेदी पब्लिक (०.२ टक्के) या पक्षांना संसदेतील प्रवेशासाठी आवश्यक असलेली ३.२५ टक्के मतांची किमान मर्यादा ओलांडता आलेली नाही. लष्करी कर्मचाऱ्यांच्या मतांसह दुहेरी पाकिटांमध्ये जमा झालेल्या मतांची मोजणी नंतर केली जाते.
बुधवारी ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’ या समाजमाध्यमावरील इर्विंग सी. श्वार्ट्झ यांची एक टिप्पणी शेअर केली. त्यात म्हटले होते की, “राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी बिबी नेतान्याहू यांना पाठिंबा दिल्यानंतर परिस्थिती पूर्णपणे बदलली.” या टिप्पणीमध्ये पुढे म्हटले होते की, एका सक्षम पंतप्रधानाचा दारुण पराभव होईल, असे वाटत असताना आता नेतान्याहू यांनी पिछाडीवरून जोरदार पुनरागमन केल्याचे दिसत आहे. त्यामुळे निवडणुकीत पेच निर्माण झाला असला, तरी याला नेतान्याहू यांचा विजयही म्हणता येऊ शकतो.“हे सर्व राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या पाठिंब्यामुळे घडले. त्यांना मध्यपूर्व, इस्रायल आणि अमेरिका या तिन्हींचे हित साधायचे आहे,” असेही या टिप्पणीमध्ये नमूद करण्यात आले आहे.
वृत्तानुसार, टेक्सासमधील एका सभेला उपस्थित राहिल्यानंतर एअर फोर्स वन या राष्ट्राध्यक्षांच्या विमानातून पत्रकारांशी संवाद साधताना ट्रम्प यांनी नेतान्याहू यांच्या कामगिरीचे कौतुक केले. इस्रायलच्या पंतप्रधानांनी अपेक्षेपेक्षा खूपच चांगली कामगिरी केल्याचे त्यांनी सांगितले.ट्रम्प म्हणाले, “मतदानाचे आकडे चुकीचे असल्याचे मी ऐकले होते. एक्झिट पोलचे आकडेही वेगळे होते. मात्र, नेतान्याहू यांनी खूप चांगली कामगिरी केल्याचे मला समजले. निवडणुकीत अटीतटीची लढत होती; पण त्यांनी अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली. त्यांना पाठिंबा मिळू लागल्यानंतर त्याचा मोठा फायदा झाला.”ते पुढे म्हणाले, “आत्ताच कोणताही निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल. मात्र, इस्रायलमधील प्रमुख व्यक्तींकडून मला असे ऐकायला मिळत आहे की, नेतान्याहू यांनी लोकांच्या अपेक्षेपेक्षा खूपच चांगली कामगिरी केली आहे. निवडणुकीत बरोबरी होईल किंवा ते विजय मिळवतील, असे चित्र दिसत आहे.”
निवडणुकीपूर्वी नेतान्याहू यांनी ट्रम्प यांच्या समर्थनाचे जाहीरपणे कौतुक केले होते. रविवारी रात्री उशिरा दूरचित्रवाणीवरून केलेल्या भाषणात त्यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे आभार मानले.नेतान्याहू म्हणाले, “अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलच्या पंतप्रधानांना यापूर्वी कधीही न मिळालेल्या प्रकारची मैत्री दाखवली आहे. भविष्यात आपल्याला इतका चांगला मित्र असलेला दुसरा अमेरिकन राष्ट्राध्यक्ष मिळेल, असे मला वाटत नाही.”ते पुढे म्हणाले, “ट्रम्प यांच्या कार्यकाळातील अजून दोन वर्षे शिल्लक आहेत आणि त्यांनी तुम्हा सर्वांना मला मतदान करण्याचे आवाहन केले आहे.”
रविवारी समाजमाध्यमांवरील एका पोस्टमध्ये ट्रम्प यांनी इस्रायली नागरिकांना नेतान्याहू यांना मतदान करण्याचे आवाहन केले होते. त्यांनी लिहिले होते, “पंतप्रधानपदासाठी बिबी नेतान्याहू यांना मतदान करा. आपण सुरू केलेले काम पूर्ण केले पाहिजे!”.
नेतान्याहू यांनी असेही संकेत दिले आहेत की, इस्रायल आणि अमेरिका इराणविरोधात आणखी पावले उचलू शकतात. इराणकडून निर्माण होणारा धोका कायमस्वरूपी संपवण्यासाठी ट्रम्प आवश्यक ती कारवाई करण्यास तयार असल्याचे त्यांनी म्हटले.नेतान्याहू यांनी इस्रायलची गुप्तचर संस्था मोसाद आणि इस्रायल संरक्षण दलाला (आयडीएफ) इराणमध्ये सत्तापालट घडवून आणण्याच्या दिशेने काम करण्याचे निर्देश दिल्याचेही सांगितले.
दरम्यान, एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, नेतान्याहू यांच्या गटाला आणि आयझेनकोट यांच्या गटाला प्रत्येकी सुमारे ५१ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. अरब पक्षांना सुमारे १८ जागा मिळण्याचा अंदाज होता.नेतान्याहू यांनी उजव्या विचारसरणीचे सरकार स्थापन करण्याची मागणी केली आहे. तसेच ज्यू मतदार आणि ज्यू राष्ट्राला पाठिंबा देणाऱ्या नागरिकांमध्ये आपल्या गटाला “मोठे आणि निर्णायक बहुमत” असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode