मध्य स्पेनमध्ये दोन रेल्वेगाड्यांची भीषण धडक; १० जणांचा मृत्यू
माद्रिद, 28 ऑक्टोबर (हिं.स.)।मध्य स्पेनमध्ये दोन रेल्वेगाड्यांमध्ये भीषण टक्कर झाली. या अपघातात सुमारे १० जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. स्पेनच्या रेल्वे यंत्रणेचे संचालक अदिफ (एडीआयएफ) यांनी सांगितले की, बुधवारी सकाळी टोलेदो प्रांतात हा अपघात झ
मध्य स्पेनमध्ये दोन रेल्वेगाड्यांची भीषण धडक; १० जणांचा मृत्य


माद्रिद, 28 ऑक्टोबर (हिं.स.)।मध्य स्पेनमध्ये दोन रेल्वेगाड्यांमध्ये भीषण टक्कर झाली. या अपघातात सुमारे १० जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. स्पेनच्या रेल्वे यंत्रणेचे संचालक अदिफ (एडीआयएफ) यांनी सांगितले की, बुधवारी सकाळी टोलेदो प्रांतात हा अपघात झाला.या घटनेनंतर माद्रिद, सियुदाद रियाल आणि अँडालुसिया यांच्यातील रेल्वे सेवा बंद करण्यात आली आहे.

वृत्तानुसार, एकाच दिशेने धावणाऱ्या दोन अतिवेगवान रेल्वेगाड्यांची टक्कर झाली. त्यातील एका गाडीने दुसऱ्या गाडीच्या मागील भागाला धडक दिली. या धडकेमुळे इर्यो रेल्वेगाडीचे दोन डबे रुळांवरून घसरले. उर्दा शहराचे महापौर मॅन्युएल गॅलान यांनी स्पेनच्या सरकारी दूरचित्रवाणी वाहिनीला सांगितले की, या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार करण्यासाठी नागरी संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या नगरपालिकेच्या सभागृहाला एक क्रीडा संकुल तयार ठेवण्यास सांगितले आहे.

लॉस येबेनेस गावाचे महापौर जीसस पेरेझ यांनीही माध्यमांशी बोलताना हा अपघात अत्यंत भीषण असल्याचे दिसत असल्याचे सांगितले. कॅस्टिला-ला मांचा प्रांताचे प्रादेशिक अध्यक्ष एमिलियानो गार्सिया-पेज यांनी ‘एक्स’वरील संदेशात आपण अपघातस्थळी जात असल्याचे म्हटले आहे.

अदिफने बुधवारी ‘एक्स’वर संदेश प्रसिद्ध करून सांगितले की, दोन रेल्वेगाड्यांमध्ये टक्कर झाल्यानंतर माद्रिद-अंदालुसिया अतिवेगवान रेल्वे मार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली आहे.कॅस्टिला-ला मांचा प्रांतातील एका सरकारी प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ९ वाजल्यानंतर काही वेळातच रेनफे आणि इर्यो या रेल्वे कंपन्यांच्या गाड्यांमध्ये टक्कर झाली. या अपघातात इर्यो रेल्वेगाडीचे दोन डबे रुळांवरून घसरले. अपघाताचे नेमके कारण आणि जखमींची संख्या याबाबत अद्याप माहिती गोळा केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

विशेष म्हणजे, सुमारे नऊ महिन्यांपूर्वी ज्या रेल्वे मार्गावर अपघात झाला होता, त्याच मार्गावर पुन्हा हा अपघात घडला आहे. त्यावेळीही अतिवेगवान रेल्वेगाड्यांचा अपघात झाला होता आणि त्यात ४६ जणांचा मृत्यू झाला होता. जानेवारीमध्ये कॉर्डोबा प्रांतातील अदामुझजवळ हा भीषण अपघात झाला होता. त्यावेळी एक रेल्वेगाडी रुळांवरून घसरून समोरून येणाऱ्या दुसऱ्या रेल्वेगाडीला धडकली होती. या दुर्घटनेत ४६ जणांना जीव गमवावा लागला होता. या वारंवार घडणाऱ्या अपघातांमुळे अलीकडच्या वर्षांत रेल्वे मार्गांची देखभाल आणि दुरुस्ती यासाठी करण्यात आलेल्या गुंतवणुकीच्या प्रमाणाबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande