आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा सन २०२७-२०३२ बृहत आराखडा जाहिर
आरोग्यसेवांची उपलब्धता व गुणवत्तेला प्राधान्य नाशिक, 28 ऑक्टोबर (हिं.स.) - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा सन २०२७-२०३२ या कालावधीसाठी नव्या आरोग्यशास्त्र महाविद्यालयांच्या परवानगीसाठी बृहत आराखडा तयार केला आहे. आरोग्यसेवांची उपलब्धता, भ
आरोग्य विद्यापीठ


* आरोग्यसेवांची उपलब्धता व गुणवत्तेला प्राधान्य

नाशिक, 28 ऑक्टोबर (हिं.स.) - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा सन २०२७-२०३२ या कालावधीसाठी नव्या आरोग्यशास्त्र महाविद्यालयांच्या परवानगीसाठी बृहत आराखडा तयार केला आहे. आरोग्यसेवांची उपलब्धता, भौगोलिक परिस्थिती, प्रयोगशाळा, कौशल्य प्रशिक्षण आणि आवश्यक पायाभूत सुविधांवर आधारित बृहत आराखडयाची मांडणी करण्यात आली आहे.

विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांनी सांगितले की, बृहत आराखडयात राज्यातील आरोग्यसेवांची उपलब्धता व गरजेनुसार आरोग्य शिक्षणसंस्थांचा नियोजनबद्ध विस्तार करणे महत्वपूर्ण आहे. नवीन पदवी महाविद्यालयांना मान्यता प्रदान करणे ऐवढेच नसून त्याची व्यापकता वाढविण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. विद्यमान संस्थांमधील मान्यताप्राप्त अभ्यासक्रम किंवा प्रवेशक्षमता वाढ यांसाठी स्वतंत्र नियोजन तरतुदी करण्यात आल्या आहेत. नवीन महाविद्यालयांचा प्रस्ताव संबंधित आयोग, शासन आणि विद्यापीठाने निर्देशित केलेल्या नियमांनुसार कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यांनी संागितले.

ते पुढे म्हणाले की, या बृहत आराखडयात लोकसंख्येनुसार जिल्हानिहाय नियोजन, रुग्णभार, भौगोलिक परिस्थिती आणि ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागांची गरज लक्षात घेऊन शाखानिहाय वर्गीकरण करण्यात आले आहे. आरोग्य शिक्षणाचा गरजाधारित विस्तार, आरोग्य सेवांची उपलब्धता व गुणवत्तेला प्राधान्य देणारा हा बृहत आराखडा असणार आहे. विद्यापीठाने डिजिटल प्रणालीचा वापर नवीन महाविद्यालयांचे संलग्निकरण प्रक्रिया सुरळीत केली आहे. याकरीता ऑनलाइन अर्ज, निर्धारित

वेळापत्रक, टप्पानिहाय शुल्क व छाननी आणि नोंदींची पडताळणी आदी प्रक्रिया करण्यात येते. याव्दारा विद्यापीठातर्फे संशोधन, डिजिटल आरोग्य, परीक्षा सुरक्षितता, विद्यार्थी कल्याण आणि शैक्षणिक प्रगती आदी उपक्रमांना चालना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले

विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी संागितले की, विविध शैक्षणिक संस्थांना नवीन पदवी महाविद्यालय सुरू करण्याबाबतचे अर्ज विद्यापीठाकडे सादर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. संबंधित संस्थाचालकांनी दि. 31 ऑक्टोबर 2026 असून ऑनलाईन अर्ज आवश्यक शुल्कासह अर्ज भरणे आवश्यक आहे. सदर ऑनलाईन अर्जाच्या दोन छापील प्रती विद्यापीठात जमा करण्याची अंतीम तारीख 5 नोव्हेंबर 2026 अशी आहे. विद्याशाखानिहाय फॅकल्टीचे विविध निकष आहेत त्यानुसार एकाच

विद्याशाखेच्या महाविद्यालयांसाठी जास्त अर्ज जरी आले तरी जितके महाविद्यालयाचे रिक्त आहेत त्यानुसार शिफारस केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नर्सिंग व फिजिओथेरपी महाविद्यालयांची वाढती संख्या लक्षात घेता या विद्याशाखांच्या महाविद्यालयांचे पुनर्मूल्यांकन करणे प्रस्तावित आहे. याबाबत विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर सूचना जाहिर करण्यात येणार आहे.

आरोग्य शिक्षण, संशोधन आणि आरोग्यसेवा हे राज्याच्या सामाजिक व आर्थिक प्रगतीचे अधिष्ठान आहेत. बदलती आरोग्य परिस्थिती, वाढती लोकसंख्या, सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील आव्हाने आणि वेगवान तांत्रिक प्रगती यांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य क्षेत्रात दूरदृष्टीपूर्ण आणि संतुलित नियोजन आवश्यक आहे. यापूर्वीच्या बृहत आराखड्याच्या माध्यमातून मिळालेला अनुभव, तज्ज्ञ व हितधारकांच्या सूचना आणि राज्य व केंद्र शासनाच्या धोरणात्मक निर्णयाचा आधार घेऊन हा नवीन आराखडा सर्वसमावेशक करण्यात आला आहे. गुणवत्तापूर्ण आरोग्य शिक्षण, कुशल मनुष्यबळाचा विकास, नैतिक व नावीन्यपूर्ण संशोधन आणि राज्याच्या सर्व भागांत आरोग्यसेवांची समतोल उपलब्धता यावर बृहत आराखडयात विशेष भर देण्यात आला आहे.

विद्यापीठाची जागतिक स्तरावर एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी बृहत आराखड्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करणे गरजेचे आहे. सामाजिक व प्रादेशिक आरोग्य गरजांशी सुसंगत अभ्यासक्रम व संस्थात्मक विस्तार करणे, संलग्न महाविद्यालयांमध्ये डिजिटल आरोग्य शिक्षण आणि मूल्यमापनाद्वारे गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यात येत आहे. शासनाच्या धोरणानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांत आरोग्य शिक्षणाची महाविद्यालये असणे आवश्यक आहे त्यानुसार योग्य मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब करण्यात येत आहे.

विद्यापीठाचा सन 2027 - 2032 कालावधीतील बृहत आराखडयानुसार शैक्षणिक व प्रशासकीय सेवांसाठी ’एक खिडकी प्रणाली’ आणि डिजिटल परिवर्तन घडवून आणणे, ब्लॉकचेन तंत्रज्ञानाद्वारे परीक्षा सुरक्षा अधिक मजबूत करणे, ’मेंटॉर-मेंटी’ कार्यक्रमांद्वारे विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य व समावेशक अध्ययनास प्राधान्य देणे आणि नैतिक आचरणासह जबाबदार डिजिटल प्रशासनाला प्रोत्साहन देण्यावर भर दिला जाणार आहे. विद्यापीठात संशोधन, आंतरविद्याशाखीय कार्य व जागतिक शैक्षणिक सहकार्याला गती देण्यासोबतच अध्यापन रुग्णालये, क्लिनिकल ट्रेनिंग, सिम्युलेशन सुविधा आणि कौशल्याधारित शिक्षण यावर भर देण्यात येत आहे. यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन व व्यावसायिक नीतिमूल्ये जपणारे सक्षम आरोग्य शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावे यासाठी विद्यापीठाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

विद्यापीठाचा बृहत आराखडा आरोग्य शिक्षणाचा पाया बळकट करणे, संशोधनातील उत्कृष्टता वाढविणे आणि सक्षम व संवेदनशील आरोग्य मनुष्यबळ विकसित करण्यांसाठी तसेच गुणवत्ता सुधारणा, नवोन्मेष, कौशल्य विकास, नैतिक वैद्यकीय आचरण आणि संतुलित प्रादेशिक वाढ यावर भर देणारा असल्याने आरोग्यसेवांची उपलब्धता व दर्जा सुधारण्यास निश्चितच मार्गदर्शक असणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande