शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत गुणात्मक परिवर्तनासाठी सर्वेक्षणाची मदत होईल - मुख्यमंत्री
मुंबई, 28 ऑक्टोबर (हिं.स.)। शासकीय योजनांची व्याप्ती वाढविणे, अधिकाधिक नागरिकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचविणे आणि त्यांच्या अंमलबजावणीतील परिणामकारकता तपासणे महत्वाचे असल्याने यासाठी सर्वेक्षण होणे गरजेचे आहे. सर्वेक्षणाच्या माध्यमातून शासकी
शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत गुणात्मक परिवर्तनासाठी सर्वेक्षणाची मदत होईल - मुख्यमंत्री


मुंबई, 28 ऑक्टोबर (हिं.स.)। शासकीय योजनांची व्याप्ती वाढविणे, अधिकाधिक नागरिकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचविणे आणि त्यांच्या अंमलबजावणीतील परिणामकारकता तपासणे महत्वाचे असल्याने यासाठी सर्वेक्षण होणे गरजेचे आहे. सर्वेक्षणाच्या माध्यमातून शासकीय योजनाच्या प्रभावी अंमलबजावणी बरोबरच त्यामध्ये गुणात्मक परिवर्तन होण्यास मदत होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

माहिती व जनसंपर्क विभागामार्फत नियुक्त ॲक्सिस माय इंडिया या संस्थेमार्फत विविध विभागांच्या योजनांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. यासंदर्भात सह्याद्री अतिथिगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना आणि योजना पश्चात सर्वेक्षणाबाबत बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तसेच सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, विविध शासकीय विभागांच्या सहकार्याने योजनांच्या सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. योजनांच्या कार्यप्रणालीचा अभ्यास, लाभार्थ्यांच्या माहितीचे विश्लेषण, योजनांमुळे साध्य झालेल्या परिणामांचे मूल्यमापन आणि त्यातून पुढील सुधारणांसाठी आवश्यक बाबी निश्चित करणे, अशा विविध स्तरांवर काम केले जात आहे. राज्यातल्या अधिकाधिक नागरिकांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी या सर्वेक्षणांचा चांगला उपयोग होऊ शकतो. योजनांच्या अंमलबजावणीसंदर्भात सर्वेक्षणातून मिळणारी माहिती केवळ माहितीपुरती मर्यादित न ठेवता, त्यातून प्रत्यक्ष कामकाजात सुधारणा घडवून आणण्यास मदत होईल. उपलब्ध माहितीच्या आधारे योजनांची सद्यःस्थिती समजून घेणे, लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यात येणाऱ्या अडचणी ओळखणे आणि अपेक्षित परिणाम साध्य करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे शक्य होणार आहे. त्यासाठी संबंधित विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांनी आवश्यक सहकार्य करावे, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, या सर्वेक्षणाच्या माध्यमातून योजनांबद्दलची अचूक माहिती मिळण्यास मदत होईल तसेच शासनाच्या योजनांसाठी असणारा प्रतिसाद समजण्यास मदत होईल. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून अचूक डेटा बेस तयार होईल आणि लोकांना शासकीय योजनांचा अधिक लाभ मिळण्यास मदत होईल. या सर्वेक्षणातून शासकीय योजनांबाबत अधिक विश्वासार्हता निर्माण होऊन राज्य शासनास अचूक माहिती मिळेल आणि गुणात्मक परिवर्तन होण्यास मदत होईल.

क्षेत्रीय कार्यालयांचा सहभाग महत्वाचा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, योजनांची व्याप्ती वाढविण्यासाठी आणि त्यांची अंमलबजावणी अधिक सुलभ करण्यासाठी क्षेत्रीय स्तरावरील कार्यालयांची भूमिका महत्वाची आहे. प्रत्यक्ष क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी आवश्यक सहकार्य करून माहिती संकलन व विश्लेषणाच्या प्रक्रियेत समन्वय साधावा आणि योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पूरक वातावरण निर्माण करावे.

शासकीय यंत्रणा आणि संबंधित संस्थेने एकसंघ भावनेतून काम केल्यास योजनांच्या अंमलबजावणीत अधिक चांगले परिणाम साधता येतील. उपलब्ध माहितीचा योग्य वापर, समन्वयपूर्ण कार्यपद्धती आणि प्रत्यक्ष क्षेत्रातील अनुभव यांच्या आधारे प्रशासकीय कामकाजात सुधारणा घडवून आणता येईल. या माध्यमातून शासनाच्या विविध योजना अधिक परिणामकारक होण्यासह नागरिकांपर्यंत त्यांचा लाभ पोहोचविण्याच्या प्रक्रियेत गुणात्मक परिवर्तन घडविणे शक्य होईल, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

बैठकीस राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव, मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह विविध विभागांचे अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव उपस्थित होते. तर विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह जिल्हास्तरीय अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande