
मुंबई, 28 ऑक्टोबर, (हिं.स.)। महाराष्ट्राची समृद्ध लोकसंस्कृती, परंपरा आणि कलांचा वारसा केवळ गणेशोत्सवापुरता मर्यादित न राहता वर्षभर जनमानसात जिवंत राहावा, या उद्देशाने ‘bappa.org’ या उपक्रमाच्या पुढील टप्प्यात ‘बाप्पाचा कट्टा’ हा ९० दिवसांचा सांस्कृतिक उपक्रम मुंबई आणि पुणे येथे आयोजित करण्यात येणार आहे. गुरुवार, २९ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू होणाऱ्या या उपक्रमात सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार आणि बाप्पा डॉट ऑर्गचे श्रीपाद आष्टेकर यांच्या सहभागातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरांना व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचविण्याच्या संकल्पनेला पुढे नेत या उपक्रमाद्वारे सर्वसामान्य कुटुंबे, मित्रमंडळी आणि सहकाऱ्यांना आपले कलागुण सादर करण्याची संधी मिळणार आहे. उखाणे, मंगळागौरीचे खेळ, भोंडला, पोवाडा, लोककला, म्हणी, अंताक्षरी तसेच पारंपरिक आणि आधुनिक कलांच्या संगमातून हा सांस्कृतिक कट्टा रंगणार आहे.
मुंबईतील वांद्रे बँडस्टँड आणि पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रस्ता (एफ.सी. रोड) येथे या उपक्रमाचे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. दर रविवारी सायंकाळी होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी जोड्यांना महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीशी संबंधित कलाप्रकार तीन मिनिटांत सादर करता येतील. कुटुंबीय, मित्र, सहकारी, विद्यार्थी-शिक्षक किंवा एकत्र राहणाऱ्या व्यक्तींच्या जोड्यांना सहभागी होता येणार असून, जोडीतील किमान एका सदस्याचे वय १८ ते ३५ वर्षे असणे आवश्यक आहे. भारतीय भाषांमधून सादरीकरण करता येईल; मात्र त्यात मराठीतील किमान एक ओळ असणे आवश्यक आहे.
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही. इच्छुकांनी ‘bappa.org’च्या +९१ ९१३६१ ७२६८१ या व्हॉट्सॲप क्रमांकावर ३० सेकंदांचा ऑडिशन व्हिडिओ पाठवावा. प्रत्येक शहरातून दर आठवड्याला १६ जोड्यांची निवड केली जाणार आहे. विजेत्यांची निवड व्हॉट्सॲपद्वारे होणाऱ्या सार्वजनिक मतदानाच्या आधारे करण्यात येईल. प्रत्येक मोबाईल क्रमांकावरून आठवड्यातून एकदाच मतदान करता येईल.
प्रत्येक शहरात साप्ताहिक स्पर्धेतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे पाच हजार, तीन हजार आणि दोन हजार रुपयांची रोख पारितोषिके देण्यात येतील. तसेच सुवर्ण, रौप्य आणि कांस्य स्वरूपातील ‘मोदक करंडक’ प्रदान करण्यात येणार आहेत. प्रत्येक कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण यूट्यूबवर केले जाईल. दर आठवड्याला सेलिब्रिटी सह-यजमान सहभागी होऊन कलाकारांना प्रोत्साहन देतील.
उद्या उद्घाटन सोहळे
गुरुवार, २९ ऑक्टोबर रोजी मुंबईतील वांद्रे बँडस्टँड येथे सायंकाळी ७ वाजता, तर पुण्यातील एफ.सी. रोड येथे सकाळी १० वाजता उद्घाटन सोहळा होणार आहे. या उपक्रमातून महाराष्ट्राच्या लोककला, परंपरा आणि सांस्कृतिक वारशाचे जतन करणाऱ्या कुटुंबांचा गौरव करण्यात येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर