
अमरावती, 29 ऑक्टोबर (हिं.स.) । शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरातील गल्लीबोळा, बाजारपेठा, विविध वस्त्या तसेच शाळांच्या परिसरात मोकाट कुत्र्यांचे कळप फिरताना दिसत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरातील विविध भागांत मोकाट कुत्री दुचाकीस्वारांच्या मागे धावत असल्याने वाहनचालकांचा तोल जाण्याची आणि अपघात घडण्याची शक्यता वाढली आहे. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या कुत्र्यांच्या वावरामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी कुत्र्यांच्या सततच्या भुंकण्यामुळे नागरिकांची झोपमोड होत असून, काही ठिकाणी नागरिकांच्या अंगावर धावून जाण्याच्या घटनांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मोकाट कुत्र्यांच्या समस्येवर ठोस उपाययोजना करण्याऐवजी प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. एखाद्या नागरिकावर कुत्र्याने हल्ला केल्यानंतर किंवा गंभीर दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाने हालचाल करायची का?, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
शहरातील वर्दळीचे रस्ते, शाळा, बाजारपेठा आणि सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांचा वाढता वावर लक्षात घेता नगरपरिषद प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. मोकाट कुत्र्यांचा प्रश्न केवळ त्रासापुरता मर्यादित नसून, तो नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित आहे. त्यामुळे नगर परिषद प्रशासनाने तातडीने दखल घेऊन शहरासह ग्रामीण भागातील परिस्थितीचा आढावा घ्यावा आणि ठोस उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
निर्बिजीकरण व लसीकरण आवश्यक शहराबरोबरच ग्रामीण भागातही मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी नियोजनबद्ध उपाययोजना करणे आवश्यक आहे. मोकाट कुत्र्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी नियमानुसार निर्बिजीकरण, लसीकरण आणि आवश्यक पशुवैद्यकीय देखभालीची व्यवस्था करावी. तसेच नागरिकांना तक्रार नोंदविण्यासाठी प्रभावी यंत्रणा उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
-------------------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी