
अमरावती, २९ ऑक्टोबर (हिं.स.) : अंजनगाव सुर्जी नगरपरिषदेत सत्ता स्थापन होऊन दहा महिने उलटले असतानाही प्रभाग क्रमांक २ मधील अस्वच्छतेच्या समस्या कायम असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत. नगराध्यक्षांच्या निवासस्थानाचा परिसर असलेल्या या प्रभागात ठिकठिकाणी साचलेला कचरा, तुंबलेल्या नाल्या आणि स्वच्छतेतील अनियमिततेमुळे रहिवासी त्रस्त असल्याचे चित्र आहे. नगराध्यक्षांच्याच प्रभागात मूलभूत स्वच्छतेचा प्रश्न कायम असेल, तर शहरातील इतर प्रभागांची परिस्थिती काय असेल, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
प्रभागात झाडू कर्मचारी नियमितपणे येत नसल्याची, नाल्यांची वेळेवर सफाई होत नसल्याची तसेच कचरा संकलनात अनियमितता असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. परिसरातील खेळाची मैदाने अस्वच्छ राहत असल्याने आणि विविध ठिकाणी घाण साचत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. दैनंदिन स्वच्छतेसारख्या मूलभूत सुविधांबाबतच समस्या कायम असल्याने रहिवाशांमध्ये नाराजी वाढत आहे.
प्रभागात डास प्रतिबंधक फवारणी नियमितपणे केली जात नसल्याची तक्रारही नागरिकांकडून होत आहे. साचलेली घाण आणि तुंबलेल्या नाल्यांमुळे परिसरातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. यासोबतच आवश्यक नागरी सुविधा आणि विकासकामांबाबतही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. नियमितपणे कर भरणाऱ्या नागरिकांना स्वच्छ परिसर आणि मूलभूत सुविधा मिळणार नसतील, तर नगरपरिषद प्रशासन नेमके कोणासाठी काम करीत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
प्रभागातील स्वच्छतेच्या समस्यांवरून नागरिकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. झाडू कर्मचारी नियमितपणे कधी येणार? नाल्यांची सफाई वेळेवर कधी होणार? कचरा संकलनाचे नियोजन काय आहे? डास प्रतिबंधक फवारणी नियमितपणे कधी केली जाणार? या प्रश्नांची उत्तरे नगराध्यक्ष आणि संबंधित प्रशासनाने द्यावीत, अशी अपेक्षा रहिवाशांकडून व्यक्त होत आहे.
कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर नियंत्रण ठेवावे, कचरा संकलन नियमित करावे आणि प्रलंबित विकासकामांबाबत ठोस नियोजन जाहीर करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
नगरपरिषदेत सत्ता स्थापन होऊन दहा महिने उलटूनही मूलभूत स्वच्छतेच्या समस्या कायम असल्याच्या तक्रारींमुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेबरोबरच उत्तरदायित्वाचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. नगराध्यक्षांच्या प्रभागातील अस्वच्छता दूर करण्यासाठी प्रशासन आता ठोस पावले उचलणार का आणि नागरिकांना स्वच्छ परिसर मिळणार कधी, याकडे अंजनगाव सुर्जीकरांचे लक्ष लागले आहे.
------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी