
अमरावती, 29 ऑक्टोबर (हिं.स.)। धारणी मेळघाटातील दुर्गम भागातील रस्ते व पुलांच्या समस्येमुळे शेतकऱ्यांना आपला शेतमाल बाजारपेठेत पोहोचवतानाही जीव धोक्यात घालावा लागत असल्याचे विदारक चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. भांडूम येथील शेतकरी जिजा सिनू दारसिंबे या मका विक्रीसाठी वाहन क्रमांक एमएच २८ बीबी १२७५ मधून धारणी येथे जात असताना गडगा नदीपात्रातील घाटात वाहन मागे सरकून उलटले. या घटनेत मका पिकाचे मोठे नुकसान झाल्याची माहिती असून, वाहनमालक या अपघातातून थोडक्यात बचावले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
शेतकरी दिवसरात्र मेहनत करून, पाऊस-पाण्याची चिंता न करता वाढत्या शेतीखर्चाचा भार पेलत पीक उभे करतो. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची आशा या पिकावर अवलंबून असते. मात्र, हाच शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाताना रस्ते आणि पुलांच्या अपुऱ्या सुविधांमुळे अपघात घडत असतील, तर शेतकऱ्यांनी आपल्या कष्टाचा मोबदला मिळवायचा तरी कसा, असा प्रश्न या घटनेमुळे उपस्थित झाला आहे. मका विकून कुटुंबाच्या गरजा भागवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या शेतकऱ्याला या अपघातामुळे मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. आधीच शेतीचा खर्च, निसर्गाची अनिश्चितता आणि बाजारभावाच्या अडचणींनी त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांसाठी असे नुकसान म्हणजे मोठा आर्थिक आघात आहे. शेतकऱ्यांच्या कष्टाचा सन्मान आणि नागरिकांच्या जीवाची सुरक्षा ही केवळ आश्वासनांची बाब नसून, प्रशासनाची जबाबदारी आहे. गडगा नदीवरील पुलाचे काम आणखी किती दिवस रखडणार आणि शेतकऱ्यांना सुरक्षित मार्ग कधी मिळणार, याकडे आता संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.
गडगा नदीपात्रातील पुलाचे बांधकाम अनेक दिवसांपासून प्रलंबित असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी आहे. पुलाचे काम वेळेत पूर्ण झाले असते, तर अशा धोकादायक परिस्थितीला सामोरे जाण्याची वेळ आली नसती, अशी संतप्त भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहेत. पुलाच्या बांधकामातील विलंबाला जबाबदार कोण, काम पूर्ण होण्यास आणखी किती दिवस लागणार आणि या काळात नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोण घेणार, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या घाट परिसरात यापूर्वीही अनेक अपघात घडल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणेने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन पुलाचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी जोर धरत आहे.
पावसाळ्यात गडगा नदीला मोठ्या प्रमाणात पूर येत असल्याने या परिसरातील नागरिकांची चिंता आणखी वाढते. भांडूम, ग. भांडूम, दाभिया यांसह परिसरातील अनेक गावांच्या दळणवळणासाठी हा नदीमार्ग महत्त्वाचा आहे. नदीला पूर आल्यास नागरिकांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. रुग्णांना वेळेत उपचारासाठी नेणे, विद्यार्थ्यांची ये-जा आणि शेतमालाची वाहतूक अशा अनेक बाबींवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
प्रशासन आणखी किती दिवस वाट पाहणार?
आज मका भरलेले वाहन नदीपात्रात कोसळले; सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र, उद्या अशी घटना घडली आणि एखाद्याचा जीव गेला, तर त्याची जबाबदारी कोण घेणार? हा प्रश्न आता केवळ एका शेतकऱ्याच्या नुकसानीपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर संपूर्ण परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेशी जोडला गेला आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने गडगा नदीवरील पुलाच्या बांधकामाची सद्यस्थिती स्पष्ट करावी, काम पूर्ण करण्याची निश्चित मुदत जाहीर करावी आणि तोपर्यंत घाट परिसरात आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी