
छत्रपती संभाजीनगर, 29 ऑक्टोबर (हिं.स.)विहामांडवा ते नवगाव येथे लागलेल्या भीषण आगीत ३० शेतकऱ्यांचा १०० एकरांहून अधिक क्षेत्रावरील ऊस जळून खाक झाला. तसेच मोसंबीच्या बागांसह इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या दुर्दैवी घटनेमुळे शेतकरी बांधवांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. आमदार विलास भुमरे यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानग्रस्त क्षेत्राची पाहणी केली तसेच शेतकरी बांधवांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
या कठीण प्रसंगी शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, यासाठी श्री रेणुका देवी शरद सहकारी साखर कारखान्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना कोणतीही कपात न करता आगग्रस्त शेतकऱ्यांचा ऊस तातडीने गाळपासाठी घेण्याचे निर्देश दिले. तसेच इतर साखर कारखान्यांनीही कोणतीही कपात न करता या शेतकऱ्यांचा ऊस गाळपासाठी स्वीकारावा, अशा सूचना देण्यात आल्या.
शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आणि त्यांच्यासमोरील अडचणी लक्षात घेता, त्यांना शक्य तितका दिलासा मिळवून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल. या संकटाच्या काळात शेतकरी बांधवांना वाऱ्यावर न सोडता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना मदत मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis