तिवसा येथे शेतकरी कालव्यात वाहून गेल्याची घटना
आनंदवाडी परिसरातील मोठ्या कालव्यात शोधमोहीम सुरू अमरावती, 29 ऑक्टोबर (हिं.स.) । अमरावती जिल्ह्यातीलतिवसा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर परिसरातील शेतकरी दिवाकर उर्फ पिंटू सुखदेव माहोरे (वय ५३) हे आनंदवाडी परिसरातून वाहणाऱ्या मोठ्या कालव्यात वा
तिवसा येथे शेतकरी कालव्यात वाहून गेल्याची घटना.. आनंदवाडी परिसरातील मोठ्या कालव्यात शोधमोहीम सुरू


आनंदवाडी परिसरातील मोठ्या कालव्यात शोधमोहीम सुरू

अमरावती, 29 ऑक्टोबर (हिं.स.) । अमरावती जिल्ह्यातीलतिवसा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर परिसरातील शेतकरी दिवाकर उर्फ पिंटू सुखदेव माहोरे (वय ५३) हे आनंदवाडी परिसरातून वाहणाऱ्या मोठ्या कालव्यात वाहून गेल्याची घटना बुधवार, दि. २८ ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आली. कालव्यातील पाण्याच्या जोरदार प्रवाहात ते वाहून गेल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच अमरावती जिल्हा शोध व बचाव पथकासह स्थानिक नागरिकांनी शोधमोहीम सुरू केली. मात्र, वृत्त लिहिपर्यंत त्यांचा शोध लागलेला नव्हता.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दिवाकर माहोरे यांची मौजा सुरवाडी येथे सुमारे चार एकर शेती आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ते रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्याचे काम एका सहकाऱ्याच्या मदतीने करीत होते. बुधवारी सकाळी शेतातील पाणी बंद केल्यानंतर त्यांनी शेतात पाणी देण्याच्या कामात मदत करणाऱ्या व्यक्तींना सातरगाव येथे सोडण्यासाठी प्रवास केला. त्यानंतर परत येत असताना सकाळी सुमारे ७.३० वाजताच्या दरम्यान आनंदवाडी परिसरातील मोठ्या कालव्याजवळ त्यांनी आपली दुचाकी (क्र. एमएच २७ ए.के. ६०४२) उभी केल्याची माहिती समोर आली आहे.यानंतर हात-पाय धुण्यासाठी कालव्याजवळ गेले असता पाय घसरून ते पाण्यात पडले असावेत, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने ते प्रवाहासोबत वाहून गेल्याची शक्यता आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. त्यानंतर त्यांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले.

जिल्हा शोध व बचाव पथकाकडून शोधमोहीम

या घटनेप्रकरणी दिवाकर माहोरे यांच्या मोठ्या भावाने तिवसा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर संबंधित यंत्रणांना माहिती देण्यात आली. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा शोध व बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम हाती घेतली. स्थानिक नागरिक आणि मित्रपरिवाराकडूनही त्यांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, कालव्यातील पाण्याचा वेग आणि प्रवाहामुळे शोधकार्यात अडचणी निर्माण होत असल्याचे सांगण्यात येत आहे.दिवाकर माहोरे यांचा शोध घेण्यासाठी बचाव पथकाचे प्रयत्न सुरू असून, त्यांच्या ठावठिकाण्याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि मोठा आप्तपरिवार आहे. या घटनेमुळे माहोरे कुटुंबावर चिंतेचे सावट पसरले असून, ते सुखरूप मिळावेत, अशी अपेक्षा नातेवाईक आणि परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande