इराणविरोधी लष्करी मोहिमेच्या चर्चेदरम्यान हेगसेथ यांनी अमेरिकेच्या वरिष्ठ जनरलला पदावरून हटवले
वॉशिंग्टन, 29 ऑक्टोबर (हिं.स.)।इराणविरोधात अमेरिकेकडून नव्या लष्करी हल्ल्यांची चर्चा सुरू असतानाच, अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी लष्करातील वरिष्ठ अधिकारी लेफ्टनंट जनरल ब्रेट सिल्व्हिया यांना त्यांच्या पदावरून हटवले आहे. ते जॉइंट चीफ्स ऑफ
इराणविरोधी लष्करी मोहिमेच्या चर्चेदरम्यान हेगसेथ यांनी अमेरिकेच्या वरिष्ठ जनरलला पदावरून हटवले


वॉशिंग्टन, 29 ऑक्टोबर (हिं.स.)।इराणविरोधात अमेरिकेकडून नव्या लष्करी हल्ल्यांची चर्चा सुरू असतानाच, अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी लष्करातील वरिष्ठ अधिकारी लेफ्टनंट जनरल ब्रेट सिल्व्हिया यांना त्यांच्या पदावरून हटवले आहे. ते जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफमध्ये रणनीती, नियोजन आणि धोरणाशी संबंधित महत्त्वाच्या पदावर कार्यरत होते.

संरक्षण विभागातील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सिल्व्हिया यांना पदावरून हटवण्यामागील कारण स्पष्ट करण्यात आलेले नाही. तसेच, त्यांच्या जागी अद्याप कोणत्याही नव्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली नाही. सिल्व्हिया यांच्याआधी या पदावर कार्यरत असलेले लेफ्टनंट जनरल जोसेफ मॅकगी यांनाही गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये निवृत्त व्हावे लागले होते. जॉइंट स्टाफच्या प्रवक्त्यांनी सिल्व्हिया आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी ३२ वर्षे देशाची सेवा केल्याचे प्रवक्त्यांनी सांगितले. मात्र, त्यांना पदावरून हटवण्यामागील कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराणविरोधात नव्या लष्करी मोहिमेचा विचार करत असताना सिल्व्हिया यांना पदावरून हटवण्यात आले आहे. इस्रायलसोबत युद्ध सुरू झाल्यानंतर ट्रम्प यांनी अनेकदा इराणविरोधातील लष्करी मोहीम पूर्ण करण्याबाबत वक्तव्य केले आहे. मध्यावधी निवडणुकांनंतर इराणवर पुन्हा हल्ले केले जाऊ शकतात, असे संकेतही त्यांनी दिले आहेत. मात्र, याबाबत अद्याप अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही.या प्रकरणाची माहिती असलेल्या दोन राजनैतिक अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अमेरिकन अधिकाऱ्यांनी मध्यपूर्वेतील अनेक देश आणि प्रादेशिक मित्रराष्ट्रांना संभाव्य लष्करी कारवाईसाठी सज्ज राहण्यास सांगितले आहे. इराणकडून प्रत्युत्तरादाखल हल्ले होण्याची शक्यता लक्षात घेऊन सतर्क राहण्याच्या सूचनाही त्यांना देण्यात आल्या आहेत.दरम्यान, अमेरिकेची तिसरी विमानवाहू युद्धनौका आणि हजारो अतिरिक्त सैनिक मध्यपूर्वेच्या दिशेने रवाना होत आहेत.

संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांच्या कार्यकाळात आतापर्यंत सुमारे दोन डझन जनरल, ॲडमिरल आणि इतर वरिष्ठ लष्करी अधिकारी पद सोडून गेले आहेत किंवा त्यांना पदावरून हटवण्यात आले आहे. यामध्ये लष्कर आणि नौदलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. बहुतांश प्रकरणांमध्ये पेंटागॉनने या निर्णयांमागील स्पष्ट कारणे सार्वजनिक केलेली नाहीत.

गेल्या महिन्यात हेगसेथ यांनी वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या पदांची संख्या कमी करण्याची प्रक्रिया वेगवान करण्याचे आदेश दिले होते. या योजनेनुसार, १ जानेवारी २०२७ पर्यंत जनरल आणि फ्लॅग ऑफिसर स्तरावरील पदांची संख्या २० टक्क्यांनी कमी केली जाणार आहे. सध्या अशा पदांची संख्या सुमारे ८०० आहे. या कपातीमुळे लष्करातील उत्तरदायित्व वाढेल, असा हेगसेथ यांचा दावा आहे.

मात्र, वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना सातत्याने पदावरून हटवले जात असल्याबद्दल अमेरिकन काँग्रेसमधील काही सदस्यांनी चिंता व्यक्त केली आहे. या निर्णयांमुळे लष्कराच्या अनुभवी नेतृत्वाला धक्का बसू शकतो आणि त्याची भरपाई करण्यासाठी अनेक वर्षे लागू शकतात, असे त्यांचे म्हणणे आहे.

अमेरिकेचे सिनेटर मार्क केली यांनीही याबाबत चिंता व्यक्त केली आहे. लष्कर आपल्या सर्वोत्तम अधिकाऱ्यांची संपूर्ण एक पिढी गमावू शकते आणि या नुकसानीतून सावरण्यासाठी बराच काळ लागेल, असे त्यांनी म्हटले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande