आम्ही रशियाला अमेरिकेपेक्षा अधिक ओळखतो- झेलेन्स्की
कीव, 29 ऑक्टोबर (हिं.स.)।युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी म्हटले आहे की, रशियाची विचारसरणी आणि राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा हेतू युक्रेनला अमेरिकेपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे समजतात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्
आम्ही रशियाला अमेरिकेपेक्षा अधिक ओळखतो- झेलेन्स्की


कीव, 29 ऑक्टोबर (हिं.स.)।युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी म्हटले आहे की, रशियाची विचारसरणी आणि राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा हेतू युक्रेनला अमेरिकेपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे समजतात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि आपले उद्दिष्ट रशिया-युक्रेन युद्ध संपवणे हेच आहे. मात्र, शांतता प्रस्थापित करण्याच्या मार्गांबाबत दोन्ही नेत्यांची मते वेगवेगळी आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.झेलेन्स्की यांनी हे विधान ब्रिटिश वृत्तपत्राला बुधवारी दिलेल्या मुलाखतीत केले.

झेलेन्स्की यांच्या मते, रशियासोबतच्या युक्रेनच्या दीर्घ ऐतिहासिक अनुभवामुळे रशियन नेतृत्वाची मानसिकता समजून घेण्यास मदत होते.झेलेन्स्की म्हणाले की, रशियासोबतचे युद्ध संपवण्याच्या मुद्द्यावर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि आपण एकाच बाजूने आहोत; मात्र, हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी दोघांचे मार्ग वेगवेगळे आहेत. पुतिन यांच्या विचारसरणीचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, पुतिन यांची मानसिकता आणि वास्तवाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन यांवर सोव्हिएत काळाचा खोलवर प्रभाव आहे.

युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांच्या या ताज्या विधानामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेला उधाण आले आहे. झेलेन्स्की म्हणाले, “माझ्या पिढीचा जन्म सोव्हिएत संघात झाला होता. त्यामुळे ही विचारसरणी मला चांगल्या प्रकारे समजते.”पुतिन खोटे बोलत असतील, तर ते आपल्याला ओळखता येते, असेही झेलेन्स्की यांनी सांगितले. ते म्हणाले, “आम्ही अनेक वर्षे रशियन नागरिकांचे शेजारी म्हणून राहिलो आहोत. त्यामुळे रशियन नागरिकांना अमेरिकेच्या तुलनेत आम्ही अधिक स्पष्टपणे समजू शकतो, असे मला वाटते. रशियासोबतचा युक्रेनचा थेट आणि दीर्घकालीन अनुभव रशियन नेतृत्वाचे वर्तन समजून घेण्यात आम्हाला आघाडी मिळवून देतो.”

झेलेन्स्की यांनी पुढे सांगितले की, जागतिक सुरक्षेचा विचार करून अमेरिका रशियासोबत विविध मुद्द्यांवर चर्चा करू शकते. मात्र, युक्रेनला पुतिन यांच्यासह रशियन सैनिकांची आणि सामान्य नागरिकांची मानसिकताही समजते.ते म्हणाले, “रशियन नागरिक एखादी कृती करण्यास कधी तयार असतात आणि पुतिन यांच्या भीतीमुळे ते कधी असे वागतात, हे आम्हाला माहीत आहे. त्यांना तुरुंगात जाण्याचा धोका असल्याचीही जाणीव आहे. जर ते युक्रेनच्या नागरिकांना मारण्यासाठी गेले नाहीत, तर पुतिन त्यांच्यावर स्वतःच्या पद्धतीने कारवाई करतील.”

अमेरिकेसोबतच्या संबंधांबाबत बोलताना झेलेन्स्की यांनी दोन्ही देशांमध्ये रणनीतीवरून मतभेद असल्याचे मान्य केले. ते म्हणाले, “यामुळेच राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी काही मुद्द्यांवर आम्हाला पाठिंबा दिला आहे, तर इतर काही मुद्द्यांवर आमची मते वेगळी आहेत.” झेलेन्स्की यांचे हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा त्याच्या आदल्याच दिवशी अमेरिकेच्या प्रथम महिला मेलानिया ट्रम्प यांनी रशिया आणि युक्रेनदरम्यान संघर्षविराम लागू झाल्याची घोषणा केली होती. युद्धग्रस्त भागातील गरजू नागरिकांपर्यंत मानवतावादी मदत पोहोचवता यावी, यासाठी निर्धारित वेळेच्या दोन दिवस आधीच हा संघर्षविराम लागू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande