
वॉशिंग्टन , 29 ऑक्टोबर (हिं.स.)।ब्राझीलच्या राजकारणात निवडणुकीनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशातच ब्राझीलचे माजी राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांचे पुत्र आणि सिनेटर फ्लाव्हियो बोल्सोनारो यांनी देशातील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे निकाल मान्य करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. एवढेच नव्हे, तर त्यांनी स्वतःला देशाचे ‘खरे राष्ट्राध्यक्ष’ घोषित केले असून, विद्यमान राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांचा विजय निवडणुकीतील गैरप्रकारांमुळे झाल्याचा आरोप केला आहे.ब्राझीलच्या राजकारणात दीर्घकाळ सक्रिय राहिल्यानंतर फ्लाव्हियो आपल्या कुटुंबासह देश सोडून अमेरिकेत पोहोचले आहेत.
बुधवारी ब्राझीलमधील नागरिकांना आणि आंतरराष्ट्रीय समुदायाला उद्देशून जारी केलेल्या विस्तृत निवेदनात त्यांनी देश सोडण्यामागील कारण स्पष्ट केले. देश सोडण्याच्या त्यांच्या निर्णयाला पलायन किंवा ‘पळून जाणे’ असे समजू नये, असे त्यांनी म्हटले आहे.“मी ब्राझीलमधून पळून गेलेलो नाही. उलट, ब्राझीलच्या हितासाठीच मी देशाबाहेर गेलो आहे, हे मला स्पष्ट करायचे आहे,” असे फ्लाव्हियो यांनी सांगितले. देशात राजकीय छळ आणि हुकूमशाहीसदृश वातावरण निर्माण झाले असल्याचा आरोपही त्यांनी केला. अशा परिस्थितीत ब्राझीलमध्ये राहिलो असतो, तर मला खुलेपणाने राजकीय नेतृत्व करता आले नसते, असे ते म्हणाले.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष जेव्हियर मिलेई यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दलही फ्लाव्हियो यांनी त्यांचे आभार मानले.
फ्लाव्हियो यांनी २५ ऑक्टोबर रोजी झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचा दावा केला. त्यांच्या आरोपानुसार, पहिल्या आणि दुसऱ्या फेरीतील मतदानादरम्यान राष्ट्राध्यक्ष लुला दा सिल्वा यांना १० लाखांहून अधिक मते मिळाली, जे गणितीयदृष्ट्या अशक्य आहे.याशिवाय, मतदानाची वेळ वाढवण्यात आल्याच्या निर्णयावर आणि न्यायव्यवस्थेच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मात्र, आपल्या या आरोपांच्या समर्थनार्थ त्यांनी कोणतेही ठोस पुरावे सादर केलेले नाहीत. विशेष म्हणजे, त्यांच्या स्वतःच्या लिबरल पार्टीने (पीएल) निवडणुकीचे अधिकृत निकाल आधीच स्वीकारले आहेत. तथापि, लोकशाहीच्या चौकटीत राहून निवडणुकीसंदर्भातील शंका उपस्थित करत राहणार असल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे.
फ्लाव्हियो यांनी ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयावर स्वतःसह आपल्या कुटुंबाविरोधात राजकीय सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचा आरोप केला आहे. आपला पासपोर्ट जप्त करणे, नजरकैदेत ठेवणे आणि राजकीय हेतूने शिक्षा सुनावणे यांसारख्या कारवायांची योजना आखली जाऊ शकते, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.मात्र, सध्या आपल्याविरोधात अटकेचे कोणतेही वॉरंट जारी करण्यात आलेले नाही आणि आपण कोणताही गुन्हा केलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
फ्रान्सचे प्रसिद्ध नेते चार्ल्स द गॉल आणि व्हेनेझुएलातील विरोधी पक्षांच्या नेत्यांशी स्वतःची तुलना करत फ्लाव्हियो यांनी अमेरिकेत राहूनच ब्राझीलमधील विरोधी पक्षाचे नेतृत्व करणार असल्याचे सांगितले. ब्राझीलमध्ये खुलेपणाने आपले मत मांडण्यास घाबरणाऱ्या नागरिकांचा आवाज आपण बनून राहू, असे आश्वासनही त्यांनी समर्थकांना दिले.
याशिवाय, सिनेटच्या अध्यक्षपदासाठी त्यांनी सिनेटर रोजेरियो मारिन्हो यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे. शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गांचा अवलंब करून विरोधकांना एकत्र आणण्याची रणनीती लवकरच जाहीर करणार असल्याचेही फ्लाव्हियो यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode