आशियाई क्रीडा स्पर्धेत अमन सेहरावतला पुरुषांच्या ५७ किलो फ्रीस्टाईल कुस्तीत सुवर्णपदक
नागोया (जपान), 03 ऑक्टोबर (हिं.स.)भारतीय कुस्तीपटू अमन सेहरावतने आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या ५७ किलो फ्रीस्टाईल गटात सुवर्णपदक पटकावले. अंतिम सामन्यात त्याने उत्तर कोरियाच्या चोंग सोंग हानचा पराभव करत उत्कृष्ट कामगिरी केली. अमनने अंतिम सामन
अमन सेहरावत


नागोया (जपान), 03 ऑक्टोबर (हिं.स.)भारतीय कुस्तीपटू अमन सेहरावतने आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या ५७ किलो फ्रीस्टाईल गटात सुवर्णपदक पटकावले. अंतिम सामन्यात त्याने उत्तर कोरियाच्या चोंग सोंग हानचा पराभव करत उत्कृष्ट कामगिरी केली.

अमनने अंतिम सामन्याची सुरुवात बचावात्मक पवित्रा घेत केली. हानने अमनच्या डाव्या पायावर वारंवार हल्ला करण्याचा प्रयत्न केला; मात्र अमनने त्याचे सर्व प्रयत्न यशस्वीपणे परतवून लावले आणि सामन्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात एकही गुण होऊ दिला नाही. त्यानंतर अमनला ‘पॅसिव्हिटी’ म्हणजेच आक्रमकता न दाखवल्याबद्दल चेतावणी देण्यात आली आणि त्याच्या प्रतिस्पर्ध्याला एक गुण मिळाला. मात्र, अमनने लगेचच दमदार ‘टेकडाऊन’ करत खाते उघडले. विश्रांतीपूर्वी त्याने आणखी एक शानदार टेकडाऊन करत ४-१ अशी आघाडी मिळवली.

दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला आणखी एका शानदार 'टेकडाऊन'सह अमनने आपली आघाडी ६-१ अशी वाढवली, परंतु गुडघ्याच्या दुखापतीशी संघर्ष करत असूनही हानने जोरदार पुनरागमन केले.उत्तर कोरियाच्या खेळाडूने 'टेकडाऊन' आणि 'रोल'च्या मदतीने अल्पावधीत सहा गुण मिळवले आणि अमनची ६-१ ची आघाडी ७-६ अशा पिछाडीत बदलली.सामना हातातून निसटत असताना, अमनने चार गुणांची महत्त्वपूर्ण खेळी केली; त्याने 'टेकडाऊन'साठी दोन आणि 'रोल'साठी आणखी दोन गुण मिळवून १०-७ अशी आघाडी पुन्हा मिळवली.त्यानंतर हानने घेतलेले आव्हान अयशस्वी ठरल्यामुळे अमनला एक गुण मिळाला; त्यानंतर त्याने आपली आघाडी कायम राखत विजय मिळवला आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक आपल्या नावे केले. शुक्रवारी सुजीत कलकलने जिंकलेल्या सुवर्णपदकानंतर, चालू आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे कुस्तीतील हे दुसरे सुवर्णपदक ठरले.

अमनने हानच्या सुरुवातीच्या आक्रमणांविरुद्ध भक्कम बचाव केला आणि त्यानंतर प्रभावी आक्रमक तंत्राचा वापर करून मोठी आघाडी घेतली. दुसऱ्या सत्रात काही काळ सहा गुण गमावूनही, त्याने निर्णायक खेळी करत सामन्यावर पुन्हा नियंत्रण मिळवले आणि एक अविस्मरणीय विजय साकारला.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande