मिठी नदी गाळ उपसा घोटाळ्याप्रकरणी आदित्य ठाकरेंची चौकशी करा - शीतल म्हात्रे
मुंबई, 03 ऑक्टोबर (हिं.स.)। मिठी नदी गाळ उपशात झालेल्या ६५ कोटींच्या घोटाळ्यात अभिनेता दिनो मोरिया याला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली असून या प्रकरणी उबाठा आमदार आदित्य ठाकरे यांची चौकशी व्हावी अशी मागणी शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी आज के
मिठी नदी गाळ उपसा घोटाळ्याप्रकरणी आदित्य ठाकरेंची चौकशी करा - शीतल म्हात्रे


मुंबई, 03 ऑक्टोबर (हिं.स.)। मिठी नदी गाळ उपशात झालेल्या ६५ कोटींच्या घोटाळ्यात अभिनेता दिनो मोरिया याला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली असून या प्रकरणी उबाठा आमदार आदित्य ठाकरे यांची चौकशी व्हावी अशी मागणी शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी आज केली. आदित्य ठाकरे आणि दिनो मोरिया यांचे व्यावसायिक संबंध असून कोविड काळात मुंबई महापालिकेतून दिलेल्या कंत्राटांची श्वेत पत्रिका काढावी अशी मागणी म्हात्रे यांनी यावेळी केली. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

म्हात्रे म्हणाल्या की दिनो मोरियाची अटक हे मिठी नदी गाळ उपसा घोटाळ्यातील हिमनगाचे टोक आहेत. या घोटाळ्यात दिनो मोरियाचा मित्र आदित्य ठाकरे याचा थेट संबंध आहे. मोरिया आणि आदित्य खास मित्र आहेत हे सर्वश्रुत आहे. महापालिकेत नगरसेवक असताना दिनो मोरिया पालिकेत वारंवार यायचा. दिनो मोरिया आणि कंत्राटदार केतन कदम पार्टनर असल्याचे संभाषणातून सिद्ध झालाय. दिनो मोरिया आणि आदित्य ठाकरे यांची प्रत्येक कॉन्ट्रॅक्टमध्ये कमिशन घेणारी वसुली गँग आहे असा खळबळजनक आरोप म्हात्रे यांनी केला. कोविडकाळातील खिचडी घोटाळा, बॉडी बॅग घोटाळा, कोविड सेंटर घोटाळा, ऑक्सिजन प्लॅन्ट अशा कॉन्ट्रॅक्टची सखोल चौकशी होऊन श्वेत पत्रिका काढावी अशी मागणी म्हात्रे यांनी मुंबई महापालिका आयुक्तांकडे केली.

त्या पुढे म्हणाल्या की दिशा सालियन हत्ये प्रकरणात दिनो मोरिया याचे नाव आहे. मिठी नदी घोटाळा असो किंवा दिशा सालियन हत्याकांड असो दिनो मोरिया याचे नाव पुढे येत आहे. त्यामुळे दिनो मोरिया याच्या मोबाईल मधील चॅट आणि कॉल डेटा जनतेसमोर यायला हवा. यातून अनेक गोष्टींचा उलगडा होईल.

दिनो मोरियाची ज्या प्रकारे चौकशी सुरू आहे त्याच प्रकारे आदित्य ठाकरेची आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी करावी अशी मागणी म्हात्रे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे केली. यासंदर्भात शिवसेनेकडून मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र दिले जाईल, असे म्हात्रे म्हणाल्या. ठाण्यातील प्रदीप पुर्णेकर हत्येचा पोलीस तपास करत आहेत. तपासातून सत्य समोर येईल असे त्या म्हणाल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande