फ्लाय दुबई घटनेमागे दहशतवादी हल्ल्याचा कट : यूएई अटर्नी जनरल
दुबई, 03 ऑक्टोबर (हिं.स.)। संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) फ्लाय दुबईच्या एफझेड १०७३ या विमानात घडलेल्या घटनेमागे दहशतवादी हल्ल्याचा कट असल्याचे यूएईचे अटर्नी जनरल डॉ. हमद अल शम्सी यांनी म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, सहवैमानिकाने उड्डाणादरम्यान आ
UAE FLYDUBAI PLANE INCIDENT Attorney General


दुबई, 03 ऑक्टोबर (हिं.स.)। संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) फ्लाय दुबईच्या एफझेड १०७३ या विमानात घडलेल्या घटनेमागे दहशतवादी हल्ल्याचा कट असल्याचे यूएईचे अटर्नी जनरल डॉ. हमद अल शम्सी यांनी म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, सहवैमानिकाने उड्डाणादरम्यान आपल्या योजनेची अंमलबजावणी सुरू केली आणि कॉकपिटमध्ये क्रॅश ॲक्सने कॅप्टनवर हल्ला करून विमानाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला.

अटर्नी जनरल यांच्या म्हणण्यानुसार, घटनेची संपूर्ण परिस्थिती, त्यामागील हेतू आणि संभाव्य संबंधांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे. भौतिक आणि डिजिटल पुराव्यांची तांत्रिक तपासणी व विश्लेषणही केले जात आहे. सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तपासाचे अंतिम निष्कर्ष जाहीर केले जातील.

परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, यूएईचे अटर्नी जनरल डॉ. हमद अल शम्सी यांनी घटनेची परिस्थिती आणि कारणांचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतर तपास पथकाने जनरल सिव्हिल एव्हिएशन अथॉरिटी (जीसीएए) आणि यूएईच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या सहकार्याने काम सुरू केले आहे.

अटर्नी जनरल यांनी माहिती आणि पुरावे गोळा करणे, तथ्यांचा शोध घेणे तसेच घटनेशी संबंधित परिस्थिती आणि हेतू निश्चित करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. या घटनेचा कोणत्याही दहशतवादी कारवायेशी किंवा हेतूशी संबंध होता का, तसेच यामागे आधीपासून आखलेला कट किंवा कोणाचे निर्देश होते का, याचाही शोध घेण्यास सांगण्यात आले आहे.

मंत्रालयाने सांगितले की, लागू कायद्यांनुसार या घटनेचा तपास करण्याचा अधिकार यूएईच्या न्यायिक अधिकाऱ्यांना आहे. कारण हे विमान यूएईमध्ये नोंदणीकृत असून त्यावर यूएईचा ध्वज आहे. त्यामुळे विमानामध्ये घडलेल्या गुन्ह्यांवर, ते यूएईच्या हद्दीबाहेर घडले असले तरी, यूएईचे कायदे लागू होतात. या तपासात घटनेशी संबंधित सर्व परिस्थिती आणि हेतूंची चौकशी केली जाणार आहे. यामध्ये दहशतवादी कारवाया किंवा हेतू यांच्याशी संभाव्य संबंध तसेच या घटनेमागे आधीपासून आखलेली योजना किंवा कोणाचे निर्देश होते का, याचाही समावेश आहे.

दरम्यान, इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादच्या एमआयए युनिटचे माजी प्रमुख रामी इग्रा यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना, हा धार्मिक युद्धाचा प्रकार असल्याचे म्हटले आहे. ओमानच्या सहवैमानिकाच्या सामानात कट्टरतावादी इस्लामी पत्रके आढळल्याचा दावाही त्यांनी केला.

फ्लाय दुबईच्या एफझेड १०७३ या विमानाच्या कॉकपिटमध्ये घडलेल्या गंभीर घटनेबाबत बोलताना मोसादचे माजी अधिकारी रामी इग्रा यांनी भारतीय वैमानिकाच्या धैर्याचे कौतुक केले. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, कॉकपिटमध्ये निर्माण झालेल्या संकटाच्या वेळी भारतीय कॅप्टनने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून महत्त्वाची भूमिका बजावली.

इग्रा यांनी दावा केला की, सहवैमानिकाने उड्डाणादरम्यान विमानाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, भारतीय कॅप्टनने केलेली कारवाई आणि प्रवाशांनी केलेल्या हस्तक्षेपामुळे परिस्थिती अधिक गंभीर होण्यापासून रोखता आली. वेळेत कॉकपिटमध्ये हस्तक्षेप झाला नसता, तर विमानातील प्रवाशांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला असता, असेही त्यांनी म्हटले.

मोसादच्या माजी अधिकाऱ्याने दावा केला की, संबंधित सहवैमानिक ओमानचा नागरिक होता आणि त्याच्या सामानातून पॅलेस्टिनी प्रश्नाशी संबंधित कथित पत्रके आढळली होती. तो एकटाच काम करत होता की त्यामागे एखाद्या दहशतवादी संघटनेचा किंवा अन्य व्यक्तीचा हात होता, हे शोधणे तपासातील महत्त्वाचे आव्हान असेल, असे त्यांनी सांगितले. या घटनेचा संबंध धार्मिक कट्टरतावादाशी जोडताना, सहवैमानिक कथितरीत्या ‘शहादत’ या संकल्पनेने प्रभावित झाला असण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. मात्र, हे इग्रा यांचे आकलन आणि दावे आहेत. घटनेची अंतिम कारणे आणि सहवैमानिकाचा हेतू यांची पुष्टी अधिकृत तपास पूर्ण झाल्यानंतरच होणार आहे.

इग्रा यांनी ‘लोन वुल्फ’ म्हणजेच एकट्याने काम करणाऱ्या हल्लेखोराच्या शक्यतेवरही चर्चा केली. त्यांच्या मते, ऑनलाइन माध्यमांद्वारे होणारे कट्टरतावादी विचारांचे प्रसारण आणि कट्टरतावादाकडे झुकण्याची प्रक्रिया ही सुरक्षा यंत्रणांसमोरील मोठी आव्हाने बनली आहेत. सहवैमानिकाला कोणत्याही दहशतवादी संघटनेकडून निर्देश मिळाले होते का, याचाही तपास केला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

या घटनेनंतर जगभरातील विमान वाहतूक सुरक्षा यंत्रणा विमान कर्मचाऱ्यांच्या पार्श्वभूमीची पडताळणी आणि सुरक्षा प्रक्रियांच्या पुनरावलोकनावर अधिक लक्ष केंद्रित करू शकतात, असे इग्रा यांनी म्हटले. विमानाच्या संचालनाशी संबंधित व्यक्तीनेच विमानाचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न केल्यास उद्भवू शकणाऱ्या संभाव्य धोक्यालाही गांभीर्याने घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी यूएईतील दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून तेल अवीवकडे जाणाऱ्या फ्लाय दुबईच्या एफझेड १०७३ या विमानात ही घटना घडली होती. या घटनेनंतर विमानाचा मार्ग बदलण्यात आला आणि आपत्कालीन परिस्थितीत सौदी अरेबियातील तबुक विमानतळावर विमान सुरक्षितपणे उतरवण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande