साखर कारखान्यांचे बॉयलर प्रज्वलन पूर्ण; ऊसतोड मजुरांच्या आगमनाने ग्रामीण भाग गजबजणार
सोलापूर, 03 ऑक्टोबर (हिं.स.)। जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांचे बॉयलर प्रज्वलन सोहळे अनंतचतुर्दशीला पार पडले असून, यंदाच्या ऊस गाळप हंगामाला लवकरच सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर विदर्भ, मराठवाड्यासह परजिल्ह्यांतून हंगामी ऊसतोड मजुरांचे जि
sugar mill


सोलापूर, 03 ऑक्टोबर (हिं.स.)।

जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांचे बॉयलर प्रज्वलन सोहळे अनंतचतुर्दशीला पार पडले असून, यंदाच्या ऊस गाळप हंगामाला लवकरच सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर विदर्भ, मराठवाड्यासह परजिल्ह्यांतून हंगामी ऊसतोड मजुरांचे जिल्ह्यात आगमन सुरू झाले आहे.

ऊसतोड मजुरांच्या राहुट्यांसाठी गावोगावच्या मोकळ्या जागा आणि मैदानांची स्वच्छता केली जात आहे. या परिसरातील वाढलेले गवत, झाडे-झुडपे हटविण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे ऊस गाळप हंगाम सुरू होताच ग्रामीण भागातील माळराने आणि मोकळ्या जागा ऊसतोड मजुरांच्या वास्तव्यामुळे गजबजणार आहेत.

पश्चिम महाराष्ट्रात ऊस हे नगदी उत्पन्न देणारे प्रमुख पीक म्हणून घेतले जाते. सोलापूर जिल्ह्यातही ऊसाचे मोठे क्षेत्र असून, सुमारे १५ सहकारी व खासगी साखर कारखान्यांमध्ये ऊसाचे गाळप केले जाते. यंदा जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने पाणीटंचाईचा परिणाम शेती व्यवसायावर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर काही साखर कारखान्यांनी गाळप हंगामाची तयारी लवकर सुरू केली आहे.

हंगामी ऊसतोड मजूर आता सहकुटुंब जिल्ह्यात दाखल होत आहेत. अंथरुण-पांघरुण, मोजके प्रापंचिक साहित्य आणि अन्नधान्याचा लवाजमा घेऊन ट्रक, ट्रॅक्टर यांसारख्या वाहनांतून मजूर कारखाना परिसर तसेच कार्यक्षेत्रातील ग्रामीण भागात पोहोचत आहेत. आगामी काळात ऊसतोड मजुरांची संख्या वाढण्याची शक्यता असून, त्यानंतर ग्रामीण भागात हंगामाची लगबग आणखी वाढणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande