प्रसिद्ध कृष्णा दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर; सिराजचे पुनरागमन
नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर (हिं.स.)। न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे संपूर्ण वनडे मालिकेतून बाहेर झाला आहे. भारतीय क्रिक
Prasidh Krishna ruled out ODI New Zealand Siraj returns


नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर (हिं.स.)। न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे संपूर्ण वनडे मालिकेतून बाहेर झाला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शुक्रवारी सकाळी प्रसिद्धच्या उपलब्धतेबाबत अधिकृत निवेदन जारी करून ही माहिती दिली. मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करताना प्रसिद्ध कृष्णाचा समावेश करण्यात आला होता; मात्र त्याला खेळण्याची संधी मिळणे हे त्याच्या तंदुरुस्ती चाचणीवर अवलंबून ठेवण्यात आले होते. आता त्याची दुखापत पूर्णपणे बरी झाली नसल्याने त्याला आणखी काही काळ विश्रांती आणि सरावाची गरज असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.

प्रसिद्ध कृष्णा सध्या मांडीच्या स्नायूंच्या दुखापतीतून सावरत आहे. मात्र, सामन्यांमध्ये खेळण्यासाठी आवश्यक असलेली शारीरिक क्षमता आणि गोलंदाजीचा सरावाचे प्रमाण पूर्ण करण्यासाठी त्याला आणखी वेळ लागणार आहे. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत तो खेळू शकणार नाही. दरम्यान, त्याच्या पुनरागमनाच्या दृष्टीने बीसीसीआयने नियोजन केले आहे. न्यूझीलंड अ संघाविरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या आणि अखेरच्या चार दिवसीय सामन्यासाठी प्रसिद्ध कृष्णाचा इंडिया अ संघात समावेश केला जाणार आहे. मात्र, त्यापूर्वी त्याला रिटर्न टू प्ले अर्थात पुन्हा मैदानात उतरण्यासाठीची तंदुरुस्ती चाचणी उत्तीर्ण करावी लागणार आहे. या सामन्यातून त्याला प्रत्यक्ष खेळण्याचा सराव मिळेल आणि आगामी कसोटी मालिकेपूर्वी तयारी करण्याची संधी मिळेल.

दुसरीकडे, वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचे इंडिया अ संघात पुनरागमन होणार आहे. ३१ ऑक्टोबरपासून न्यूझीलंड अ संघाविरुद्ध सुरू होणाऱ्या दुसऱ्या चार दिवसीय सामन्यासाठी सिराज इंडिया अ संघात सहभागी होणार आहे. या सामन्यासाठी यशस्वी जैस्वाल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, यश राठोड, आर. स्मरण, ध्रुव जुरेल (कर्णधार व यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, आकाश दीप, शिखर मोहन, मुकेश चौधरी, मुकेश कुमार, मानव सुथार आणि कुमार कुशाग्र यांचा संघात समावेश करण्यात आला आहे.

दरम्यान, अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डी पहिल्या वनडे सामन्यापर्यंत भारतीय मुख्य संघाचा भाग राहणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला वनडे सामना ४ नोव्हेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे. या सामन्यानंतर नितीश इंडिया अ संघात सहभागी होईल. न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या चार दिवसीय सामन्यात खेळून तो दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी सराव करणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिका १९ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.

भारताच्या पहिल्या तीन वनडे सामन्यांसाठी शुभमन गिलकडे कर्णधारपद, तर श्रेयस अय्यरकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, के. एल. राहुल, अक्षर पटेल, नमन धीर, अंशुल कंबोज, गुरनूर ब्रार, ऋतुराज गायकवाड, अर्शदीप सिंग, इशान किशन, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि नितीश कुमार रेड्डी यांचाही संघात समावेश आहे. तर चौथ्या आणि पाचव्या वनडे सामन्यांसाठी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपदाची जबाबदारी असेल. या सामन्यांसाठी तिलक वर्मा, औकिब नबी, यश ठाकूर आणि कुमार कुशाग्र यांना संधी देण्यात आली आहे. प्रसिद्ध कृष्णाच्या अनुपस्थितीत भारतीय वेगवान गोलंदाजीची जबाबदारी आता सिराजसह अन्य गोलंदाजांवर राहणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande