राशिद खान ठरला आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये २०० बळींचा टप्पा गाठणारा पहिलाच गोलंदाज
अबू धाबी , 30 ऑक्टोबर (हिं.स.)।टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू राशिद खान याने एक नवा इतिहास रचला आहे. राशिदने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये २०० बळींचा टप्पा पूर्ण केला असून, अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला गोलंद
राशिद खान ठरला आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये २०० बळींचा टप्पा गाठणारा पहिलाच गोलंदाज


अबू धाबी , 30 ऑक्टोबर (हिं.स.)।टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू राशिद खान याने एक नवा इतिहास रचला आहे. राशिदने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये २०० बळींचा टप्पा पूर्ण केला असून, अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे. राशिद याने शारजाह येथे झिम्बाब्वेविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-२० सामन्यात हि ऐतिहासिक कामगिरी केली.

झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यापूर्वी राशिदच्या नावावर १९९ बळी होते. सामन्यादरम्यान त्याने झिम्बाब्वेचा यष्टिरक्षक-फलंदाज तादिवानाशे मरुमानी याला बाद करून २०० वा बळी मिळवला. या सामन्यात राशिदने घेतलेला हा एकमेव बळी होता.२०० बळींचा ऐतिहासिक टप्पा गाठणाऱ्या राशिद खानच्या आसपासही सध्या अन्य कोणताही गोलंदाज नाही. उजव्या हाताच्या या लेगस्पिनरने आपल्या कारकिर्दीतील १२० व्या सामन्यात ही कामगिरी केली.

आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या पहिल्या पाच गोलंदाजांच्या यादीत राशिद खान अव्वल स्थानावर आहे. इंग्लंडचा आदिल रशीद १५३ सामन्यांत १७१ बळींसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. हाँगकाँगचा एहसान खान ११९ सामन्यांत १६५ बळींसह तिसऱ्या, न्यूझीलंडचा ईश सोढी १४२ सामन्यांत १६५ बळींसह चौथ्या, तर न्यूझीलंडचा टीम साऊदी १२६ सामन्यांत १६४ बळींसह पाचव्या स्थानावर आहे.

केवळ टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येच नव्हे, तर एकूण टी-२० कारकिर्दीतही सर्वाधिक बळी घेण्याचा विश्वविक्रम राशिद खानच्या नावावर आहे. त्याने आतापर्यंत ५५१ सामन्यांत ७४२ बळी घेतले आहेत. टी-२० क्रिकेटमध्ये ७०० बळींचा टप्पा ओलांडणारा तो जगातील एकमेव गोलंदाज आहे.या यादीत वेस्ट इंडिजचा सुनील नरेन ६५८ बळींसह दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर ड्वेन ब्राव्हो ६३१ बळींसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande