हायलो ओपन : सिंधू आणि अनमोल खरब उपांत्यपूर्व फेरीत दाखल
सारब्रुकेन (जर्मनी), 30 ऑक्टोबर (हिं.स.)। भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने हायलो ओपन २०२६ या स्पर्धेत महिला एकेरीच्या सामन्यात शानदार कामगिरी करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. गुरुवारी झालेल्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये दुसरे मानांकन
Sports Badminton Sindhu Anmol HyloOpen


सारब्रुकेन (जर्मनी), 30 ऑक्टोबर (हिं.स.)। भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने हायलो ओपन २०२६ या स्पर्धेत महिला एकेरीच्या सामन्यात शानदार कामगिरी करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. गुरुवारी झालेल्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये दुसरे मानांकन असलेल्या सिंधूने फ्रान्सच्या रोसी ओक्टाविया पंकासारी हिचा सरळ गेममध्ये २१-९, २१-६ असा पराभव केला. हा सामना ३० मिनिटांपेक्षाही कमी वेळात संपला.

उपांत्यपूर्व फेरीत सिंधूचा सामना डेन्मार्कच्या अमाली शुल्ज हिच्याशी होणार आहे. दोन वेळा ऑलिम्पिक पदक जिंकलेली सिंधू फ्रेंच ओपन सुपर ७५० स्पर्धेत उपविजेतेपद मिळवल्यानंतर या सुपर ५०० स्पर्धेत सहभागी झाली आहे. फ्रेंच ओपनच्या अंतिम सामन्यात तिला जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या दक्षिण कोरियाच्या आन से यंग हिच्याकडून पराभव पत्करावा लागला होता.

दरम्यान, भारताची युवा खेळाडू अनमोल खरब हिनेही शानदार पुनरागमन करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. १९ वर्षीय अनमोलने प्री-क्वार्टर फायनलमध्ये उच्च मानांकन असलेल्या डेन्मार्कच्या लाइन क्रिस्टोफरसन हिचा एक तास तीन मिनिटे चाललेल्या सामन्यात ११-२१, २१-१८, २५-२३ असा पराभव केला.

पहिला गेम गमावल्यानंतर अनमोलने दुसऱ्या गेममध्ये दमदार पुनरागमन केले आणि सामना निर्णायक गेमपर्यंत नेला. तिसऱ्या गेममध्ये तिने संयम राखत २५-२३ अशी बाजी मारली. आता उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी तिचा सामना भारताच्याच उन्नती हुड्डा हिच्याशी होणार आहे.

मात्र, महिला एकेरीच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये मालविका बंसोड़ हिला पराभवाचा सामना करावा लागला. कॅनडाच्या वेन यू झांग हिने मालविकाचा २१-११, २१-१७ असा पराभव करून स्पर्धेतून तिचे आव्हान संपुष्टात आणले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande