
नवी दिल्ली, 31 ऑक्टोबर (हिं.स.)। ऑक्टोबर महिना संपत असून नोव्हेंबर या नव्या महिन्याची सुरुवात होणार आहे. अशा परिस्थितीत तुम्हीही बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (बीएसई), नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (एनएसई) किंवा मल्टी कमोडिटी एक्स्चेंजमध्ये व्यवहार अथवा गुंतवणूक करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. शेअर बाजारात या महिन्यात एकूण ११ दिवस व्यवहार होणार नाहीत. म्हणजेच ३० दिवसांच्या या महिन्यात केवळ १९ दिवसच शेअर बाजारात व्यवहार होतील. उर्वरित ११ दिवस सुट्टी असेल.
सामान्यतः शेअर बाजार आणि मल्टी कमोडिटी एक्स्चेंजमध्ये दर आठवड्याला शनिवार आणि रविवार या दिवशी साप्ताहिक सुट्टी असते. साप्ताहिक सुट्टीव्यतिरिक्त काही विशेष सण आणि राष्ट्रीय सुट्ट्यांच्या दिवशीही बाजार बंद ठेवण्यात येतो. नोव्हेंबर महिन्यात शनिवार आणि रविवार मिळून एकूण ९ दिवस साप्ताहिक सुट्टी असेल. याशिवाय कामकाजाच्या दिवसांमध्ये या महिन्यात दोन सणांमुळेही बाजार पूर्णपणे बंद राहणार आहे. सर्वप्रथम १० नोव्हेंबर रोजी दिवाळी-बलिप्रतिपदेच्या निमित्ताने शेअर बाजारात सुट्टी असल्यामुळे व्यवहार होणार नाहीत. त्यानंतर २४ नोव्हेंबर रोजी गुरुनानक देवजी यांच्या प्रकाश गुरुपर्वानिमित्त दोन्ही शेअर बाजार आणि मल्टी कमोडिटी एक्स्चेंजमध्ये सुट्टी असेल.
या दोन्ही तारखांना म्हणजेच १० आणि २४ नोव्हेंबर रोजी बीएसई आणि एनएसईच्या इक्विटी, इक्विटी डेरिव्हेटिव्ह आणि करन्सी डेरिव्हेटिव्ह या प्रमुख विभागांमध्ये पूर्णपणे सुट्टी असेल. मात्र, कमोडिटी डेरिव्हेटिव्ह आणि इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट्स (ईजीआर) या विभागांमध्ये पूर्णपणे व्यवहार बंद राहणार नाहीत. या विभागांमध्ये सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंतचे सकाळचे सत्र बंद राहील. मात्र, सायंकाळी ५ ते रात्री ११.३० आणि रात्री ११.५५ वाजेपर्यंतचे संध्याकाळचे सत्र नेहमीप्रमाणे सुरू राहील. हाच नियम मल्टी कमोडिटी एक्स्चेंज (एमसीएक्स) वरही लागू असेल.
यंदा ८ नोव्हेंबर रोजी दिवाळीचा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी रविवार असल्यामुळे शेअर बाजाराचे नियमित व्यवहार बंद राहतील. मात्र, भारतीय शेअर बाजाराच्या अनेक वर्षांपासून चालत आलेल्या परंपरेनुसार दुपारनंतर एक तासासाठी 'मुहूर्त ट्रेडिंग'चे विशेष सत्र आयोजित केले जाणार आहे. बीएसई आणि एनएसई या दोन्ही प्रमुख शेअर बाजारांनी या विशेष सत्राच्या व्यवहारांच्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे.
दिवाळीच्या दिवशी होणाऱ्या व्यवहारांसाठी निश्चित करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार, ८ नोव्हेंबर रोजी ट्रेडिंग सदस्यांचे लॉगिन दुपारी १.१५ ते १.५० या वेळेत होईल. ब्लॉक डील विंडो दुपारी १.५० ते २.०५ वाजेपर्यंत खुली राहील. त्यानंतर दुपारी २.०५ ते २.१५ वाजेपर्यंत प्री-ओपन सत्र सुरू राहील. तर दुपारी २.२० ते सायंकाळी ३.३० वाजेपर्यंत मुहूर्त ट्रेडिंगसाठी मुख्य ट्रेडिंग विंडो खुली असेल.
यानंतर पीरियॉडिक कॉल ऑक्शनची वेळ दुपारी २.२५ ते ३.२० वाजेपर्यंत, क्लोजिंग ऑक्शन सत्राची वेळ दुपारी ३.१५ ते ३.३५ वाजेपर्यंत आणि पोस्ट-क्लोजिंग सत्राची वेळ दुपारी ३.५० ते सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. नोव्हेंबर महिन्यातील साप्ताहिक सुट्ट्यांसह एकूण ११ सुट्ट्या संपल्यानंतर २०२६ या वर्षाच्या अखेरच्या महिन्यात म्हणजेच डिसेंबरमध्ये शनिवार आणि रविवार व्यतिरिक्त केवळ एकच ट्रेडिंग सुट्टी असेल. वर्षातील शेवटची अधिकृत सुट्टी नाताळनिमित्त २५ डिसेंबर रोजी असेल. या दिवशी शेअर बाजार पूर्णपणे बंद राहणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule