
रायगड, 04 ऑक्टोबर (हिं.स.)। सायबर फसवणुकीत नागरिकांकडून लुबाडलेली रक्कम पुढे वळविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘म्युल अकाउंट’च्या जाळ्यावर रायगड पोलिसांच्या सायबर विभागाने मोठी कारवाई केली आहे. विविध व्यक्तींच्या नावाने बँक खाती उघडून ती सायबर गुन्ह्यांसाठी उपलब्ध करून देणाऱ्या आणि फसवणुकीची रक्कम पुढे पाठविणाऱ्या सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईत ७२ एटीएम कार्ड, १८ मोबाईल फोन, तीन लॅपटॉप, पाच प्रीपेड कार्ड, सहा मेमरी कार्ड, एक पेनड्राइव्ह, क्रिप्टोकरन्सी वॉलेटसाठी वापरले जाणारे सात डोंगल, ५७ हजार रुपये रोख आणि एक किआ सोनेट कार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस अधीक्षक ऑचल दलाल आणि अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंकज घाटकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. गरजू व्यक्तींना कमिशनचे आमिष दाखवून त्यांच्या नावाने सेव्हिंग किंवा करंट खाती उघडून घेण्यात येत होती. त्यानंतर पासबुक, एटीएम कार्ड, चेकबुक आणि सिमकार्ड ताब्यात घेऊन ही खाती सायबर फसवणुकीची रक्कम स्वीकारण्यासाठी वापरली जात होती.
तपासादरम्यान संबंधित खात्यांवर राष्ट्रीय सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर अनेक तक्रारी असल्याचे समोर आले. याप्रकरणी २० जुलै २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. सुरुवातीला मयूर विलास म्हात्रे आणि पवन कुमार चिलीमुंटा यांना ताब्यात घेण्यात आले. पुढील तांत्रिक तपासात अभिषेक गुप्ता, अमनकुमार गुप्ता, वंश जितेंद्रकुमार सिंह आणि एका विधिसंघर्षित बालकाचा सहभाग उघड झाला.
म्युल खाती व सिमकार्ड पुढे पाठविणे, एटीएमद्वारे फसवणुकीची रक्कम काढणे आणि काही रक्कम यूएसडीटी वॉलेटमार्फत वळविण्याचे प्रकार तपासात समोर आले. दरम्यान, पैशांच्या आमिषापोटी स्वतःचे बँक खाते, सिमकार्ड किंवा कागदपत्रे अनोळखी व्यक्तींना वापरण्यास देऊ नयेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)