
रायगड, 04 ऑक्टोबर (हिं.स.)। पेण शहर परिसरातील ‘यात्री लॉज’वर सुरू असलेल्या देहव्यापाराच्या अड्ड्यावर स्थानिक पोलिसांनी धाड टाकून कुंटणखाना उद्ध्वस्त केला आहे. या कारवाईत एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली असून, आपापसात संगनमत करून देहव्यापार चालवणाऱ्या चारही आरोपींना पोलिसांनी गजाआड केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पेण पोलीस ठाण्याच्या हद्दीत मौजे पेण शहर येथील यात्री लॉजमध्ये बेकायदेशीर वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी यात्री लॉजवर अचानक छापा टाकला. आरोपी क्रमांक १ ते ४ यांनी आर्थिक फायद्यासाठी संगनमत करून एका महिलेला लॉजवर बोलावून घेतले होते. तिला ग्राहकांसमोर सादर करून तिच्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याचे तपासात उघड झाले. स्वतःच्या फायद्यासाठी सार्वजनिक ठिकाणी हा कुंटणखाना चालवला जात होता.
पोलिसांनी घटनास्थळावरून पीडित महिलेची सुटका केली. त्यानंतर कारवाईची चक्रे जलद फिरवत ३ ऑक्टोबरच्या रात्री ११:४६ वाजण्याच्या सुमारास चारही आरोपींना अटक केली. या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २४१/२०२६ अन्वये स्त्रिया व मुलींचा अनैतिक व्यापार (प्रतिबंध) कायदा कलम ३, ४, ५, ७(१)(ब) सह भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १४३(२) आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरवस्तीत सुरू असलेल्या या गैरकृत्याविरुद्ध पोलिसांनी कठोर पाऊल उचलल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास पोलीस निरीक्षक श्री. भोसले करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)