तोतया पोलीस कमिशनरकडून देवरूखच्या एलआयसी एजंटची ९४ हजारांची फसवणूक
रत्नागिरी, 4 ऑक्टोबर (हिं.स.) । देवरूख परिसरातील एका एलआयसी एजंटची व्हिडिओ कॉलद्वारे फसवणूक करण्यात आली आहे. आपण दिल्ली पोलीस कमिशनर असल्याचे भासवून एका भामट्याने अटकेची धमकी देत एलआयसी एजंटकडून ९४ हजार ९०० रुपये उकळले. याप्रकरणी देवरूख पोलिस ठाण्य
तोतया पोलीस कमिशनरकडून देवरूखच्या एलआयसी एजंटची ९४ हजारांची फसवणूक


रत्नागिरी, 4 ऑक्टोबर (हिं.स.) । देवरूख परिसरातील एका एलआयसी एजंटची व्हिडिओ कॉलद्वारे फसवणूक करण्यात आली आहे. आपण दिल्ली पोलीस कमिशनर असल्याचे भासवून एका भामट्याने अटकेची धमकी देत एलआयसी एजंटकडून ९४ हजार ९०० रुपये उकळले. याप्रकरणी देवरूख पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित एलआयसी एजंटला एका व्यक्तीने व्हिडिओ कॉल केला. आपण दिल्ली पोलीस कमिशनर असल्याचे सांगत, ‘तुमच्याविरोधात तक्रार दाखल झाली असून, तुम्हाला अटक करण्यासाठी पोलीस येत आहेत,’ अशी धमकी देण्यात आली. त्यानंतर प्रकरण मिटविण्यासाठी पैशांची मागणी करण्यात आली.

अटकेच्या भीतीने घाबरलेल्या एजंटने गुगल पे तसेच स्कॅनरच्या माध्यमातून संबंधित व्यक्तीच्या खात्यावर ९४ हजार ९०० रुपये पाठविले. त्यानंतरही पुन्हा पैशांची मागणी करण्यात आल्याने एजंटला संशय आला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने तत्काळ देवरूख पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या तक्रारीवरून देवरूख पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

व्हिडिओ कॉलवरून पोलिस अधिकारी असल्याचे भासवून अटकेची धमकी देणे आणि पैशांची मागणी करणे हा सायबर फसवणुकीचा प्रकार असल्याने नागरिकांनी अशा कॉलला बळी न पडता तत्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande