

रायगड, 04 ऑक्टोबर, (हिं.स.)। मानवी आरोग्यास घातक ठरणाऱ्या आणि शासनाने बंदी घातलेल्या सुगंधी पानमसाला व तंबाखूची बेकायदेशीर साठवणूक करून विक्री करणाऱ्या एका इसमावर खालापूर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित साठा हस्तगत करण्यात आला असून एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे हाळ बुद्रुक येथील नुरानी मोहल्ल्यात जळगावकर यांच्या चाळीतील पहिल्या मजल्यावरील खोलीत हा गैरप्रकार सुरू होता. मानवी आरोग्यास अपायकारक असल्याने महाराष्ट्र शासनाने सुगंधी पानमसाला व गुटख्याचे उत्पादन, वाहतूक, साठा व विक्रीवर पूर्णपणे बंदी घातली आहे. असे असतानाही सदर आरोपीने आर्थिक फायद्यासाठी आपल्या घरात मोठ्या प्रमाणावर या प्रतिबंधित पदार्थांची साठवणूक करून छुप्या पद्धतीने विक्री सुरू ठेवली होती. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून हा मुद्देमाल जप्त केला. व आरोपीस अटक करण्यात आली.
या प्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४२९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम २२३, २७४, २७५, १२३, ३(५) तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ च्या विविध कलमांसह शासनाच्या प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदेशीर गुटखा व नशिल्या पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी उघडलेल्या या मोहिमेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सेशन कमिटी पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) योगेश जाधव करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)