
काबूल, 04 ऑक्टोबर (हिं.स.)।पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर करण्यात आलेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करत अफगाणिस्तानातील रशियन दूतावासाने इस्लामाबाद आणि काबूल दरम्यान सुरू असलेल्या लष्करी संघर्षाबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. या संघर्षाचा सर्वाधिक विनाशकारी परिणाम निष्पाप नागरिकांवर, विशेषतः लहान मुलांवर होत असल्याकडे दूतावासाने लक्ष वेधले आहे.
सीमापार पाकिस्तानच्या लष्करी कारवायांमुळे सामान्य नागरिकांना होत असलेल्या नुकसानीवर भर देताना दूतावासाने म्हटले, “पाकिस्तान आणि अफगाणिस्तानदरम्यान सुरू असलेल्या लष्करी संघर्षाबाबत आम्ही गंभीरपणे चिंतित आहोत. या संघर्षाचा परिणाम लहान मुलांसह सामान्य नागरिकांवर होत आहे.”रशियन दूतावासाने पुढे म्हटले, “1 ऑक्टोबरच्या रात्री अफगाणिस्तानातील हेलमंद आणि कुनार प्रांतांमध्ये करण्यात आलेले हवाई हल्ले ही आणखी एक घटना आहे. या हल्ल्यांमध्ये लहान मुलांसह अनेक जण ठार आणि जखमी झाले.”
मॉस्कोकडून ही चिंता अशा वेळी व्यक्त करण्यात आली आहे, जेव्हा पाकिस्तानकडून पश्चिम सीमेवर सुरू असलेल्या लष्करी कारवायांची जगभरातून टीका होत आहे. या कारवायांमध्ये मोठ्या संख्येने सामान्य नागरिकांचा बळी गेला असून, दक्षिण आणि मध्य आशियातील प्रादेशिक अस्थिरता वाढली आहे.
दरम्यान, अफगाण सरकारच्या माहितीनुसार, गुरुवारी पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये अफगाणिस्तानच्या हद्दीत नऊ जणांचा मृत्यू झाला असून, आणखी 11 जण जखमी झाले आहेत. अफगाण सरकारचे मुख्य प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी ‘एक्स’वरील पोस्टद्वारे याची पुष्टी केली. त्यांनी सांगितले की, या विनाशकारी बॉम्बहल्ल्यांमध्ये निवासी भागांना लक्ष्य करण्यात आले. त्यामुळे कुनार आणि हेलमंद प्रांतातील तीन घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली.
या लष्करी आक्रमणामुळे नागरिकांच्या मृत्यूची संख्या वाढत असल्याचे सांगताना मुजाहिद यांनी महिला आणि मुलांसह किमान नऊ जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले.या अनावश्यक लष्करी हल्ल्याचा तीव्र निषेध करत मुजाहिद म्हणाले, “आम्ही या कृत्याला आक्रमकता आणि सर्व मान्यताप्राप्त तत्त्वांचे उल्लंघन करणारा गुन्हा मानतो.”
हे प्राणघातक हल्ले पाकिस्तानच्या आक्रमक लष्करी कारवायांचा एक भाग आहेत. यावर्षीच्या सुरुवातीपासून सीमा विवादामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने अनेक वेळा अफगाणिस्तानच्या सार्वभौम हद्दीत परवानगीशिवाय हवाई हल्ले केले आहेत. काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानच्या कुनार आणि पक्तिका प्रांतांमध्ये पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्यांत तीन नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पुन्हा झालेल्या या हल्ल्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode