
कीव , 04 ऑक्टोबर (हिं.स.)। युक्रेनने रशियाच्या तेल शुद्धीकरण केंद्रांवरील हल्ले आणखी तीव्र करण्याची घोषणा केली आहे. राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी हे युक्रेनच्या पायाभूत सुविधांवर होत असलेल्या रशियन हल्ल्यांना प्रत्युत्तर असल्याचे सांगितले. रशियाने युक्रेनमधील शहरांच्या ऊर्जा, वाहतूक आणि लॉजिस्टिक्स नेटवर्कला लक्ष्य करण्याची नवी रणनीती स्वीकारल्याचा आरोप त्यांनी केला.
झेलेन्स्की यांच्या म्हणण्यानुसार, युक्रेनच्या गुप्तचर संस्थेला मिळालेल्या कागदपत्रांवरून रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी हिवाळ्यापूर्वी रस्ते, शाळा, रुग्णालये आणि इतर नागरी सुविधांसह अनेक ठिकाणांना लक्ष्य करण्यास मंजुरी दिल्याचे समोर आले आहे. नागरिकांना कीवसह इतर शहरांमधून बाहेर पडण्यास भाग पाडण्याचा हा प्रयत्न असल्याचा दावा त्यांनी केला.
कीववर नुकत्याच झालेल्या रशियन हल्ल्यांवरून केवळ लष्करी ठिकाणेच नव्हे, तर शहराची जीवनवाहिनी असलेल्या पायाभूत व्यवस्थेलाही लक्ष्य केले जात असल्याचे स्पष्ट होत असल्याचे झेलेन्स्की यांनी म्हटले. गेल्या आठवड्यात रशियन ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी ऊर्जा, दूरसंचार, रस्ते आणि रेल्वे नेटवर्कवर मोठे हल्ले केले. याशिवाय पूर्व आणि पश्चिम कीवला जोडणाऱ्या नीपर नदीवरील पुलांनाही लक्ष्य करण्यात आले.
रशियाचे म्हणणे आहे की, हे हल्ले रशियन भूभागावर युक्रेनकडून करण्यात आलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर आहेत. मात्र, झेलेन्स्की यांनी रशियावर सामान्य नागरिकांचे जीवन कठीण करून त्यांना शहरांमधून बाहेर पडण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.झेलेन्स्की यांनी स्पष्ट केले की, युक्रेन रशियाच्या ऊर्जा पायाभूत सुविधांवर, विशेषतः तेल शुद्धीकरण केंद्रांवर प्रत्युत्तरादाखल हल्ले करत राहील. कारण या केंद्रांमधून रशियाला युद्धासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळते, असा त्यांचा दावा आहे. मात्र, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक स्तरावर डिझेलच्या किमती वाढण्याची चिंता व्यक्त करत झेलेन्स्की यांना रशियाच्या तेलविषयक प्रतिष्ठानांवरील हल्ले थांबवण्याचे आवाहन केले होते.
याउलट, मॉस्कोकडून ऊर्जा क्षेत्राबाबत युद्धविराम किंवा अर्थपूर्ण चर्चेचे कोणतेही संकेत मिळालेले नाहीत, असे झेलेन्स्की यांनी म्हटले. त्यामुळे सामान्य नागरिकांना लक्ष्य न करता रशियाच्या ऊर्जा व्यवस्थेवर हल्ले सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आगामी हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर युक्रेनची चिंता वाढली आहे. वीज आणि पाणीपुरवठ्यावर हल्ले होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, रशियाने शेकडो बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे साठवून ठेवल्याचे युक्रेनियन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.याशिवाय रशिया आता अधिक वेगवान जेट-इंजिनवर चालणाऱ्या ‘शाहेद’ ड्रोनचा वापर करत आहे. हे ड्रोन पाडणे युक्रेनच्या हवाई संरक्षण यंत्रणेसाठी आव्हानात्मक ठरत आहे.
झेलेन्स्की यांनी सांगितले की, हे ड्रोन पाडण्यासाठी युक्रेन एफ-१६ आणि मिग लढाऊ विमानांवर अवलंबून आहे. मात्र, या विमानांसाठी आवश्यक असलेल्या शस्त्रसाठ्याची कमतरता भासत आहे.
युक्रेन आता इलेक्ट्रॉनिक जॅमिंग आणि इंटरसेप्टर ड्रोन यांसारख्या तुलनेने स्वस्त पर्यायांवर काम करत आहे. या यंत्रणांच्या चाचण्या यशस्वी झाल्या असल्या तरी त्यांचा यशाचा दर सध्या सुमारे ३० टक्के आहे.
पायाभूत सुविधांवरील हल्ल्यांसोबतच पूर्व युक्रेनमध्ये जमिनीवरही युद्ध सुरू आहे. झेलेन्स्की यांनी दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनियन सैन्याने ‘विवाल्डी’ नावाच्या प्रत्युत्तरात्मक मोहिमेद्वारे डोनबासमधील सुमारे १४० चौरस किलोमीटर क्षेत्रावर पुन्हा नियंत्रण मिळवले आहे.दुसरीकडे, शांतता करारासाठी रशिया अजूनही संपूर्ण डोनबासवर नियंत्रण मिळवण्याच्या अटीवर ठाम असल्याचे सांगितले जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode