चंदीगड एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा पाच गडी राखून विजय, भारताने मालिका २-१ ने जिंकली
चंदीगड, 04 ऑक्टोबर (हिं.स.) न्यू चंदीगड येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात, कर्णधार शाई होपच्या (१६२) खेळीमुळे वेस्ट इंडिजने भारताला पाच गडी राखून पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना भारताने ३५१ धावा केल्या. वेस्ट इंडिजने १० च
भारतीय क्रिकेट संघ


चंदीगड, 04 ऑक्टोबर (हिं.स.) न्यू चंदीगड येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात, कर्णधार शाई होपच्या (१६२) खेळीमुळे वेस्ट इंडिजने भारताला पाच गडी राखून पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना भारताने ३५१ धावा केल्या. वेस्ट इंडिजने १० चेंडू शिल्लक असताना हे लक्ष्य पूर्ण केले. एकदिवसीय सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा यशस्वी धावांचा पाठलाग आहे. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा पराभव झाला असला तरी त्यांनी ही मालिका 2-1 ने जिंंकली.

वेस्ट इंडिज विरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात, केएल राहुलच्या (१२९) धमाकेदार शतकाच्या जोरावर भारताने सात गडी गमावून ३५१ धावांचा डोंगर उभा केला. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या राहुलने आपल्या खेळीत १० चौकार आणि सहा षटकारांसह अवघ्या ८७ चेंडूंमध्ये नाबाद १२९ धावा केल्या. राहुलने १६० धावांवर चार गडी बाद अशा स्थितीत असलेल्या भारतीय संघाला केवळ सावरलेच नाही, तर अखेरच्या षटकांमध्ये आपल्या स्फोटक फलंदाजीने धावसंख्या ३५० च्या पुढे नेली.

राहुलने नमन धीरसोबत ६५ धावांची भागीदारी केली. त्यानंतर त्याने गुरनूर ब्रारसोबत अवघ्या २६ चेंडूंमध्ये ६१ धावा जोडून भारतीय डावाचा शानदार शेवट केला. हे राहुलचे नववे एकदिवसीय शतक होते. त्याची १२९ धावांची खेळी ही त्याची सर्वोच्च एकदिवसीय धावसंख्या ठरली. विशेष म्हणजे, त्याने याच मैदानावर या वर्षाच्या सुरुवातीला अफगाणिस्तानविरुद्ध कसोटी शतकही झळकावले होते. यामुळे तो न्यू चंदीगडच्या मैदानावर कसोटी आणि एकदिवसीय या दोन्ही प्रकारात शतके झळकावणारा पहिला फलंदाज ठरला.

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण सुरुवात खराब झाली. कर्णधार शुभमन गिल तिसऱ्या षटकात एका धावेवर बाद झाला. पुढच्याच चेंडूवर विराट कोहलीही त्रिफळाचीत झाला. जेडन सील्सने कोहलीला बाद करताच स्टेडियम स्तब्ध झाले. एकदिवसीय सामन्यांमध्ये कोहलीला त्याच्या पहिल्याच वैध चेंडूवर बाद करणारा सील्स हा चौथा गोलंदाज ठरला. त्याच्या आधी वेस्ट इंडिजचा डॅरेन सॅमी, कायरोन पोलार्ड आणि इंग्लंडचा टिम ब्रेसनन यांनी हा पराक्रम केला आहे.

रोहित शर्माच्या १०,००० धावा पूर्ण

सुरुवातीला दोन विकेट पडल्यानंतर रोहित शर्मा आणि ऋतुराज गायकवाड यांनी डाव सावरला. दोघांनीही अर्धशतके झळकावून भारतीय संघाला संकटातून बाहेर काढले. ९२ धावा करून रोहितचे शतक हुकले, तर गायकवाडने ५७ धावा केल्या. याच काळात रोहितने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून १०,००० धावा पूर्ण केल्या.

हा पराक्रम करणारा तो जगातील चौथा फलंदाज ठरला. त्याच्या आधी सचिन तेंडुलकर (१५,३१०), सनथ जयसूर्या (१२,७४०) आणि ख्रिस गेल (१०,१७९) यांनी हा टप्पा गाठला आहे. रोहितने केवळ २०२ डावांमध्ये १०,००० धावा पूर्ण करून, हा टप्पा सर्वात जलद गाठणारा सलामीवीर म्हणून विक्रम प्रस्थापित केला.

एकदिवसीय सामन्यांमध्ये ३५०+ धावा सर्वाधिक वेळा

४५ वेळा: भारत

३६ वेळा: दक्षिण आफ्रिका

३१ वेळा: ऑस्ट्रेलिया

२९ वेळा: इंग्लंड

१८ वेळा: न्यूझीलंड

३५२ धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज संघाची सुरुवात खराब झाली. मोहम्मद सिराजने ५ व्या षटकात जॉन कॅम्पबेलला बाद केले. जॉनने दोन चौकारांच्या मदतीने ७ चेंडूंमध्ये १० धावा केल्या. त्यानंतर कर्णधार शाई होप आणि अमीर जांगू यांनी दुसऱ्या विकेटसाठी ९९ चेंडूंमध्ये १०९ धावांची भागीदारी केली, या दोघांनीही अर्धशतके झळकावली. २१ व्या षटकात विराट कोहलीच्या अप्रतिम थ्रोमुळे अमीर (६७) धावबाद झाला.

३० व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर शेर्फेन रदरफोर्ड (२४) झेलबाद झाला. केएल राहुलने झेल घेतला. मात्र, शेर्फेन रदरफोर्डने डीआरएस घेतला आणि तिसऱ्या पंचांनी त्याला बाद घोषित केले. मात्र, तो पंचांच्या निर्णयावर समाधानी दिसला नाही. त्यानंतर कर्णधार शाई होपने शतक झळकावले

४१ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर कीमो पॉल (४४) झेलबाद झाला. त्यानंतर कुलदीप यादवने मॅथ्यू फोर्डला (७) बाद केले. कर्णधार शाई होप १४३ चेंडूंमध्ये १७ चौकार आणि तीन षटकारांसह १६२ धावांवर नाबाद राहिला. आणि त्याने आपल्या संघाला विजय साकारुन दिला.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande