पितृपक्षात फुलांची मागणी घटली; दर घसरल्याने शेतकरी हवालदिल
पुणे, 04 ऑक्टोबर (हिं.स.)। गणेशोत्सवानंतर सुरू झालेल्या पितृपक्षात फुलांची मागणी कमी झाल्याने बाजारातील दरात मोठी घसरण झाली आहे. अपेक्षित दर मिळत नसल्याने फुल उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. गणेशोत्सवाच्या सुरुवातीच्या पाच दिवसांत फुलांन
फुल बाजार


पुणे, 04 ऑक्टोबर (हिं.स.)।

गणेशोत्सवानंतर सुरू झालेल्या पितृपक्षात फुलांची मागणी कमी झाल्याने बाजारातील दरात मोठी घसरण झाली आहे. अपेक्षित दर मिळत नसल्याने फुल उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. गणेशोत्सवाच्या सुरुवातीच्या पाच दिवसांत फुलांना चांगले दर मिळाले; मात्र गौरी विसर्जनानंतर दरात टप्प्याटप्प्याने घट झाली.

नवरात्रोत्सवाला ११ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असून, या काळात फुलांची मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरही सुधारतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर फुलांची लागवड केली जाते. यंदा जुलैमध्ये चांगला पाऊस झाल्याने फुलांची लागवड समाधानकारक झाली. ऑगस्टनंतर पावसाचा जोर कमी झाला. पावसामुळे फुलांचे नुकसान होण्याची शक्यता असते; मात्र यंदा श्रावण आणि गणेशोत्सवाच्या काळात तुरळक पाऊस झाला. त्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने फुलांची प्रतवारीही चांगली राहिली.

श्रावण आणि गणेशोत्सवाच्या काळात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर फुलांची बाजारात आवक केली. त्यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा वाढला आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत फुलांना अपेक्षित दर मिळू शकले नाहीत, अशी माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड फूल बाजारातील व्यापारी सागर भोसले यांनी दिली.

पितृपक्षात फुलांची मागणी तुलनेने कमी असते. त्यामुळे सध्या दरावर दबाव आहे. मात्र नवरात्रोत्सव सुरू झाल्यानंतर फुलांच्या मागणीत वाढ होऊन बाजारभावाला आधार मिळण्याची शक्यता आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande