सोलापूर-दूध संघाच्या वादात ‘विठ्ठल’ कारखान्याच्या व्यवहारांचा मुद्दा ऐरणीवर
सोलापूर, 04 ऑक्टोबर (हिं.स.)सोलापूर जिल्हा दूध संघाच्या कारभारावरून सुरू असलेल्या राजकीय वादाला आता पंढरपूर येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या आर्थिक व्यवहारांची किनार मिळाली आहे. ‘विठ्ठल’ कारखान्यात सुमारे ३५० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल
सोलापूर-दूध संघाच्या वादात ‘विठ्ठल’ कारखान्याच्या व्यवहारांचा मुद्दा ऐरणीवर


सोलापूर, 04 ऑक्टोबर (हिं.स.)सोलापूर जिल्हा दूध संघाच्या कारभारावरून सुरू असलेल्या राजकीय वादाला आता पंढरपूर येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या आर्थिक व्यवहारांची किनार मिळाली आहे. ‘विठ्ठल’ कारखान्यात सुमारे ३५० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

“तुम्ही दूध संघाची चौकशी लावा, आम्ही विठ्ठल कारखान्याची लावतो,” असे आव्हान शिंदे यांनी कारखान्याचे अध्यक्ष तथा माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांना दिले. दरम्यान, पाटील यांनी हे आरोप फेटाळत कारखान्याचे सर्व दप्तर नियम आणि कायद्याच्या चौकटीत असल्याचे स्पष्ट केले. कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तसेच समोरासमोर चर्चेस तयार असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माढा आणि पंढरपूर तालुक्यांतील राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. जिल्हा दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी जिल्हा बँकेच्या सभागृहात झाली. त्यापूर्वी श्रमिक पत्रकार संघात पत्रकार परिषद घेऊन शिंदे यांनी दूध संघाच्या कामकाजाचा आढावा मांडला.

दूध संघाच्या मालमत्ता आणि कर्जासंदर्भात आमदार पाटील यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर बोलताना शिंदे यांनी दूध संघाने परस्पर कोणतीही जागा विकलेली नसल्याचा दावा केला. पंढरपूर येथील दूध संघाची जागा राज्य शासनाच्या नियमांनुसार आणि रीतसर परवानगी घेऊन विकण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच टेंभुर्णी आणि नवी मुंबई येथील जागा दूध संघाने विकलेल्या नसून, संबंधित बँकेच्या कर्जवसुलीच्या कारवाईतून त्यांची विक्री झाल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. या कारवाईविरोधात दूध संघाने कर्ज वसुली न्यायाधिकरणात (डीआरटी) दाद मागितली असून, न्यायालयीन लढा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande