मूळ भाषा व संस्कृती विसरू नका; पुढच्या पिढीला देण्याची जबाबदारी आपली : वसुमना पंत
चंद्रपूर, ५ ऑक्टोबर (हिं.स.) : जागतिकीकरणाच्या युगात इंग्रजी, हिंदीसह विविध विदेशी भाषा अवगत करणे आवश्यक आहे. मात्र, हे करत असताना आपली मूळ भाषा आणि संस्कृती कधीही विसरता कामा नये. आपणच आपली भाषा व संस्कृती विसरलो, तर पुढच्या पिढीला देण्यासाठी आपल्
चंद्रपूर : सरदार पटेल महाविद्यालयात 'अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस' .. आपली मूळ संस्कृती व भाषा कधीही विसरता कामा नये - जिल्हाधिकारी वसुमना पंत


चंद्रपूर, ५ ऑक्टोबर (हिं.स.) : जागतिकीकरणाच्या युगात इंग्रजी, हिंदीसह विविध विदेशी भाषा अवगत करणे आवश्यक आहे. मात्र, हे करत असताना आपली मूळ भाषा आणि संस्कृती कधीही विसरता कामा नये. आपणच आपली भाषा व संस्कृती विसरलो, तर पुढच्या पिढीला देण्यासाठी आपल्याजवळ काहीच उरणार नाही. त्यामुळे आपल्या मूळ भाषेच्या समृद्धीसाठी प्रत्येकाची जबाबदारी मोठी आहे, असे परखड मत जिल्हाधिकारी तथा जिल्हा मराठी भाषा समितीच्या अध्यक्ष वसुमना पंत यांनी व्यक्त केले.

सरदार पटेल महाविद्यालयात चंद्रपूर जिल्हा मराठी भाषा समिती, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि सरदार पटेल महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस’ व अभिजात मराठी भाषा सप्ताहाचे थाटात उद्घाटन करण्यात आले. यावेळी उद्घाटनपर भाषणात वसुमना पंत बोलत होत्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर होते. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील गजभारे, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अनिल बोरगमवार, पोंभुर्णा येथील चिंतामणी महाविद्यालयाचे डॉ. परमानंद बावनकुळे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. स्वप्निल माधमशेट्टीवार तसेच मराठी विभागप्रमुख डॉ. पद्मरेखा धनकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

मराठी भाषेला ‘अभिजात भाषा’ हा दर्जा सहजासहजी मिळालेला नाही. त्यासाठी मोठी लढाई लढावी लागली, हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे, असे मत डॉ. परमानंद बावनकुळे यांनी व्यक्त केले.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर यांनी मराठी भाषेला ‘अभिजात भाषा’ म्हणून अधिकृत दर्जा मिळाल्याने केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणात अनुदान उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार अधिक व्यापक प्रमाणात होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ. पद्मरेखा धनकर यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे हा केवळ एका भाषेचा सन्मान नसून, महाराष्ट्राच्या हजारो वर्षांच्या संस्कृतीचा, इतिहासाचा आणि समृद्ध साहित्यपरंपरेचा गौरव असल्याचे सांगितले.

या निमित्ताने ‘मराठी भाषा : अभिजात भाषा’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. श्वेता चंदनकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. सोहन कोल्हे यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. धनराज मुरकुटे, प्रा. अनंत मल्लेलवार, प्रा. वैशाली पंडित, प्रा. गिरडकर आणि प्रा. पवार यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला जिल्हा ग्रंथालय अधिकारी व कर्मचारी, प्राध्यापक, विद्यार्थी तसेच मराठी भाषाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

------------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande